आशिया चषक २०२३मध्ये टीम इंडिया दर्जेदार कामगिरी करत फायनलमध्ये पोहोचली आहे. यजमान श्रीलंकेशी भारताचा अंतिम फेरीत सामना होणार आहे. एकीकडे क्रिकेट विश्वात या सामन्याची चर्चा असताना दुसरीकडे क्रिकेट आयर्लंडनं भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यादरम्यान घडलेल्या एका प्रकाराविषयी बिनशर्त माफी मागितली आहे. आयरिश टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. सामन्यादरम्यान, अश्लील मजकूर असणाऱ्या वेबसाईटची जाहिरात केल्याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर यावर क्रिकेट आयर्लंडची प्रतिक्रिया आली आहे.
नेमकं काय घडलं?
ऑगस्ट महिन्यात भारत आणि आयर्लंडमध्ये टी-२० मालिका झाली. ही मालिका भारतानं २-० अशी जिंकली. या मालिकेतील डबलिनमध्ये झालेल्या एका सामन्यादरम्यान मैदानावर काही वेबसाईट्सची जाहिरात करण्यात आली. यात जाहिरातीचे बॅनर्स, सीमारेषेवरील रोप व स्पोर्ट्स चॅनल्सवर या वेबसाईट्सच्या जाहिराती करण्यात आल्या. या जाहिरातींवर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेप घेण्यात आले.
या ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन कॅसिनोच्या वेबसाईट्स असून त्यावर अश्लील मजकूर असल्यामुळे या वेबसाईट्सच्या जाहिरातींवर आक्षेप घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे त्या मजकुराचं प्रमोशन होत असल्याचीही तक्रार अनेक चाहत्यांनी स्पोर्ट्स आयर्लंडकडे केली. त्यानंतर स्पोर्ट्स आयर्लंडनं या कंपन्यांशी असणाऱ्या जाहिरात करारांचा पुनर्विचार केला जावा, यासंदर्भात क्रिकेट आयर्लंडशी चर्चादेखील केली.
या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेट आयर्लंडनं या जाहिरातींसाठी चाहत्यांची बिनशर्त माफी मागितली आहे. “यातून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते अनावघानाने झालं असून घडल्या प्रकाराबद्दल क्रिकेट आयर्लंड बिनशर्त माफी मागत आहे”, असं आयर्लंडच्या क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
यूके गॅम्बलिंग कमिशनचीही बंदी
दरम्यान, या सामन्यात ज्या वेबसाईट्सची जाहिरात करण्यात आली होती, त्यापैकी एका कंपनीच्या जाहिराती न करण्याचा निर्णय यूके गॅम्बलिंक कमिशननं २०१९ सालीच घेतला आहे. या वेबसाईट्सवरून पॉर्न मजकूर प्रसारित केला जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. तसेच, लहान मुलांच्या खेळांवरही या वेबसाईट्सवर बेटिंग केलं जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला होता.