… ही तर सेहवागची इच्छा
क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची संख्या मर्यादितच आहे. ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून त्याची प्रगती होण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) संलग्न असलेल्या १०५ देशांपैकी फक्त १२ देशांना पूर्ण सदस्यत्व लाभले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत सेहवाग म्हणाला, ‘‘फक्त १२ देश पूर्ण सदस्य असणे हे काही खेळाच्या प्रगतीचे द्योतक नाही. ज्याप्रमाणे अन्य खेळांमध्ये भरपूर देशांचा सहभाग असतो, त्याप्रमाणे आयसीसीने या खेळातील पूर्ण सदस्य देशांची संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्वित्र्झलडसारख्या देशांमध्ये या खेळाचा प्रसार करण्याची गरज आहे.’’
महेला जयवर्धने, शोएब अख्तर, डॅनियल व्हिटोरी, मोहम्मद कैफ व ग्रॅहम स्मिथ यांच्यासमवेत सेहवाग फेब्रुवारी महिन्यात स्वित्र्झलडमध्ये प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहे. स्वित्र्झलडला आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व नाही. परंतु सेंट मॉरिट्झ येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी बर्फावरील क्रिकेटचे सामने आयोजित केले जाणार आहेत. हे सामने आयसीसीच्या मान्यतेने होणार आहेत.