हँगझोऊ (चीन) येथे २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होईल, अशी माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेने रविवारी दिली आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

‘‘२०२२च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे,’’ अशी माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे उपाध्यक्ष रणधीर सिंग यांनी दिली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटच्या समावेशाबाबत नेहमीच अनुत्सुकता दर्शवली आहे. २०२२च्या ‘एशियाड’ला अद्याप बराच अवधी बाकी आहे. आम्ही चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्यात रणधीर सिंग हँगझोऊ दौऱ्यावर गेले होते. त्याच वेळी क्रिकेटचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश निश्चित मानला जात होता. आतापर्यंत २०१०च्या ग्वांगझोऊ आणि २०१४च्या इन्चॉन ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र २०१८च्या जकार्ता ‘एशियाड’मध्ये क्रिकेटला वगळण्यात आले होते. १९९८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी भारताने आपला दुय्यम संघ क्वालालम्पूर येथे पाठवला होता. शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक आणि स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने रौप्यपदक जिंकले होते.

२०१४ मध्ये सलग दुसऱ्यांदा संघ न पाठवल्याबद्दल ‘बीसीसीआय’वर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांनी तोफ डागली होती. त्या वेळी सबाह म्हणाले की, ‘‘मी भारताच्या निर्णयाचा आदर करतो, परंतु ‘बीसीसीआय’ क्रिकेट प्रसाराऐवजी त्याचा व्यवसाय करून पैसा कमवण्यात व्यग्र आहे.’’

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियासह ओशनिया राष्ट्राना सहभागी करण्यात येणार आहे, हा महत्त्वाचा निर्णय रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

तुम्हाला हे माहीत आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • २०१० मध्ये ग्वांगझोऊ (चीन) आणि २०१४ मध्ये इन्चॉन (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. २०१० मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सुवर्णपदक प्राप्त केले होते. याचप्रमाणे २०१४ मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी अनुक्रमे पुरुषांचे आणि महिलांचे सुवर्णपदक पटकावले. मात्र क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या भारताने दोन्ही वेळी सहभाग घेतला नव्हता.
  • २०१८ मध्ये जकार्ता-पालेमबर्ग (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या क्रीडा प्रकाराला स्थान देण्यात आले नव्हते.