२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर रविवारी यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला केवळ एका विजयाची गरज आहे. मात्र दुसरीकडे यजमान इंग्लंडला आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर भारताविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं आहे. सामन्याआधी विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एखाद्या मोठ्या सामन्याआधी दडपण येतं का असा प्रश्न विचारल्यावर, विराटने हो असं उत्तर दिलं.

“मला देखील इतरांसारखं दडपण येतं, मात्र मैदानात मी ते दाखवत नाही. किंवा ते लपवण्यामध्ये मी तरबेज झालो आहे. मात्र प्रत्येक खेळाडूला मोठ्या सामन्याआधी दडपण असतंच. मात्र अशी भावना मनात येणं हे एका अर्थाने चांगलं आहे. तुमच्यावर दडपण आलं तर ते झुगारुन मैदानात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तुम्ही करता. दडपणच आलं नाही तर तुमच्यातली खेळाची जिद्द संपली आहे असं मी मानतो.” विराट पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता.

अवश्य वाचा – Video : नवीन जर्सीला विराटने दिले १० पैकी *** मार्क, तुम्ही किती द्याल ?

“फलंदाजीसाठी मैदानात उतरताना आज मला विक्रम करण्यासाठी किती धावा हव्या आहेत हा विचार आम्ही करत नाही. प्रत्येक सामन्यात संघाला आपल्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे, तसा खेळ करणं आणि संघाला विजय मिळवून देणं हे आमचं उद्दीष्ट असतं. ठरल्याप्रमाणे दडपण झुगारुन जेव्हा आम्ही खेळतो आणि त्यानंतर संघ जिंकतो ती भावना आमच्या सर्वांसाठी आनंदाची असते.” इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारत भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : विराट, विजय शंकरला संघातून काढू नकोस ! माजी इंग्लिश खेळाडूची विनंती