जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं प्राबल्य आपण प्रत्येकाने अनुभवलं आहे. भारतीय संघातील स्टार खेळाडूंमुळे अनेक खासगी कंपन्या बीसीसीआयला स्पॉन्सरशीप देण्यासाठी आतूर असतात. आयपीएल सारख्या स्पर्धेतून बीसीसीआयला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपये कमावते. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डालाही बसलेला दिसतो आहे. गेल्या १० महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने मानधन दिलं नसल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

भारताचे २७ खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणीत मोडले जातात. या सर्व खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून त्यांचं मानधनच मिळालेलं नाही. इतकच नव्हे तर डिसेंबर २०१९ पासून भारतीय संघाने खेळलेल्या दोन कसोटी, ९ वन-डे आणि ८ टी-२० सामन्यांची मॅच फी ही बीसीसीआयने अद्याप दिलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा ४ श्रेणींमध्ये विभागते. यात A+ दर्जाच्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी (रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह) मानधन मिळतं, तर उर्वरित श्रेणींमधील खेळाडूंना अनुक्रमे ५, ३ आणि १ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळतं. याव्यतिरीक्त कसोटी, वन-डे आणि टी-२० यासाठी बीसीसीआय आपल्या खेळाडूंना अनुक्रमे १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख अशी मॅच फी देतं.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या आर्थिक रेकॉर्डनुसार, संस्थेकडे ५ हजार ५२६ कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. याव्यतिरीक्त २ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बीसीसीायने एफडी स्वरुपात ठेवली आहे. याव्यतिरीक्त २०१८ साली भारतीय संघाच्या सामन्यांच्या प्रेक्षपणाचे हक्क देण्यासाठी बीसीसीआयने Star India सोबत करार केला, ज्यातून संस्थेला ६ हजार १३८ कोटी रुपये मिळाले. तरीही भारतीय संघातील करारबद्ध खेळाडूंना १० महिन्यांपासून आपलं मानधन मिळालेलं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दल बीसीसीआयने खजिनदार अरुण धुमाळ यांची प्रतिक्रीया विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावर काहीही न बोलणं पसंत केलं.

२०१९ डिसेंबर पासून बीसीसीआयमध्ये Chief Financial Officer, तसेच गेल्या महिन्यापासून Chief Executive Officer and General Manager (Cricket Operations) अशी पदं रिक्त आहेत. प्रशासकीय कामांमध्ये महत्वाच्या पदावर माणसं नसल्यामुळे अद्याप खेळाडूंना मानधन मिळण्यास उशीर होत असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली. त्यातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. हा कार्यकाळ वाढवून मिळावा यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यावर १७ ऑगस्ट रोजी निकाल येण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातील एका सिनीअर खेळाडूने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “बीसीसीआय प्रत्येक ३ महिन्यांनी आपल्या करारबद्ध खेळाडूंना invoices पाठवायला सांगतं. पण गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला याबद्दल कोणीही विचारलेलं नाही. बीसीसीआय करारबद्द खेळाडूंचं मानधन हे ४ टप्प्यांत देतं…परंतू आता मानधन कधी मिळतंय याबद्दल काहीच सांगता येत नाही. गेल्या महिन्यात आम्हाला फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्याचं invoices पाठवायला सांगितलं. परंतू अद्याप आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.” याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंनाही गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही. झारखंड, मुंबई, बंगाल, जम्मू आणि काश्मिर, पाँडीचेरी, बडोदा, रेल्वे, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक महत्वाच्या संघातील खेळाडूंना मानधन मिळालेलं नाही. बीसीसीआयने अद्याप याप्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आपलं मानधन कधी मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.