कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावाच लागतो. फॉम्र्युला-वनमध्ये तर अडथळ्यांची मालिकाच असते. मार्गातील सर्व अडथळे दूर करून मी फॉम्र्युला-वनमध्ये यश मिळवले. त्यामुळे अडथळे पार करून आपली स्वप्ने साकार करा, असा सल्ला फॉम्र्युला-वनमधील विश्वविजेता ड्रायव्हर आणि मुंबई मॅरेथॉन शर्यतीचा ब्रँड अॅम्बेसेडर डॅमॉन हिल यांनी दिला.
ते म्हणाले, ‘‘१९९९ मी फॉम्र्युला-वनमधून निवृत्त झाल्यापासून फॉम्र्युला-वनमध्ये बरेच तांत्रिक बदल झाले. कार, अभियंते, प्रत्येक शर्यतीची माहिती गोळा करणे, बारीकसारीक चुका कशा टाळण्याकडे लक्ष, प्रशिक्षकांची गरज या सर्व गोष्टींवर बराच पैसा खर्च होऊ लागला. भारतात फॉम्र्युला-वनची म्हणावी तितकी लोकप्रियता दिसत नाही. परदेशात फॉम्र्युला-वनची जबरदस्त क्रेझ आहे. आता वेटेलच्या यशामुळे फॉम्र्युला-वनची लोकप्रियता वाढू लागली आहे.’’
मुंबई मॅरेथॉनचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी जॉन केलाई सज्ज
मुंबई : सर्व उपखंडात धावण्याचा अनुभव माझ्या पाठिशी आहे. त्याचबरोबर मुंबई आणि दिल्ली मॅरेथॉन शर्यतीत अनेक वेळा सहभागी झाल्यामुळे मला भारतातील वातावरणाची आणि मुंबईतील रस्त्यांची चांगलीच माहिती आहे. शर्यतीसाठी माझी तयारी चांगली झाल्यामुळे दुसऱ्यांदा मुंबई मॅरेथॉनचे जेतेपद पटकावण्यासाठी मी सज्ज आहे, असे मुंबई मॅरेथॉनचा २००७मधील गतविजेता धावपटू जॉन केलाई याने सांगितले.
‘‘या वर्षी जेतेपदासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. नवीन धावपटूंसह धावताना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केनियाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी मी मुंबई शर्यतीत सहभागी झालो आहे. खडतर समजली जाणारी मुंबईतील शर्यत जिंकून मी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी योग्य असल्याचे केनिया सरकारला दाखवून देणार आहे,’’ असे २४ पैकी ९ मॅरेथॉन शर्यती जिंकणाऱ्या ३७ वर्षीय केलाईने सांगितले.