पीटीआय, ओस्लो
अखेरच्या फेऱ्यांमधील निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला ओस्लो ईस्पोर्ट्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली.
१६ वर्षीय प्रज्ञानंदने सुरुवातीला अप्रतिम खेळ केला होता. त्यामुळे पाचव्या फेरीअंती तो गुणतालिकेत अग्रस्थानावर होता. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तीन डावांच्या सहाव्या फेरीत पोलंडच्या यान-क्रिस्टॉफ डुडाने त्याला २.५-०.५ असे पराभूत केले. त्यानंतर सातव्या आणि अखेरच्या फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीकडून त्याला २.५-०.५ अशाच फरकाने पराभव पत्करावा लागला. गिरीविरुद्धच्या सामन्यातील पहिला डाव गमावल्यानंतर प्रज्ञानंदने दुसरा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे त्याने विजयाचा आशा कायम राखल्या; परंतु तिसऱ्या डावात खेळ उंचावण्यात अपयश आल्याने प्रज्ञानंद पराभूत झाला आणि त्याची स्पर्धेअंती थेट चौथ्या स्थानी घसरण झाली.
डुडाने १४ गुणांसह या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. व्हिएतनामचा लिएम क्वांग ले (१३ गुण), नॉर्वेचा विश्वविजेता खेळाडू मॅग्नस कार्लसन (१२ गुण) आणि प्रज्ञानंद (१२ गुण) यांना अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.