आज सर्वत्र श्रीकृष्ण जयंती साजरी केली जात असून उद्या (१९ ऑगस्ट) दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी (१७ ऑगस्ट) अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्यात ‘दहीहंडी’ या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती.

हेही वाचा – मराठमोळे चंद्रकांत पंडित देणार शाहरुखच्या संघाला प्रशिक्षण! आर्यन खानने खास पोस्ट करून केले स्वागत

स्पेन देशात मानवी मनोरे रचण्याचा खेळ खेळला जातो. त्यासाठी त्यांच्याकडे खेळाडूंना प्रशिक्षणही दिले जाते. स्पेनपेक्षा चांगले मानवी मनोरे आपली गोविंदा पथकं रचतात. त्यामुळेच त्यांचा क्रीडा प्रकारात समावेश केला जावा, अशी मागणी सातत्याने सुरू होती. राजकीय नेत्यांसह गोविंदा पथकेही गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मागणी करत होते. या मागणली आता यश आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडीतील गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळाला असल्याने गोविंदा पथकांनी आनंद व्यक्त केला आहे.