डेल स्टेनचा गौप्यस्फोट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन : भारतातील प्रेक्षकांच्या भीतीपोटी पंच इयान गोल्ड यांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला नाबाद ठरवले होते, असा गौप्यस्फोट तब्बल १० वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने केला आहे.

ग्वाल्हेर येथे २०१० मध्ये झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय लढतीत सचिनने मर्यादित षटकांमधील पहिलेवहिले ऐतिहासिक द्विशतक साजरे केले होते. मात्र सचिनच्या द्विशतकासाठी १० धावा कमी असताना स्टेनने त्याच्या गोलंदाजीवर मैदानातील पंच गोल्ड यांच्याकडे पायचीतकरता अपिल केले होते. मात्र पंचांनी ते फेटाळले त्यानंतर अर्थातच सचिनने द्विशतक साजरे केले होते. ‘‘एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेवहिले द्विशतक सचिनने आमच्याविरुद्ध ग्वाल्हेर येथे साजरे केले. मात्र त्याला मी १९० धावांच्या आसपास असताना पायचीतप्रकारे बाद ठरवण्यासाठी पंचांकडे दाद मागितली होती. इयान गोल्ड तेव्हा पंच होते. मात्र त्यांनी सचिनला नाबाद ठरवले. मी तेव्हा पंचांना तुम्ही त्याला नाबाद कसे ठरवता असे विचारत होतो. मात्र त्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांना असेच म्हणायचे होते की जर त्यांनी सचिनला बाद दिले तर त्यांना हॉटेलात भारतीय प्रेक्षक पोहोचू देणार नाहीत,’’ अशाप्रकारे स्टेनने १० वर्षांपूर्वीची आठवण सांगितली.

सचिनने त्या वेळेस नाबाद २०० धावा फटकावल्याने भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ बाद ४०३ धावा फटकावता आल्या होत्या. भारताने ती लढत १५३ धावांनी जिंकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dale steyn claims ian gould was scared to give sachin tendulkar zws
First published on: 18-05-2020 at 00:31 IST