निलंबन करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा माजी उप कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने बॉल टॅम्परिंग प्रकरणात मी स्वतःलाही दोषी मानते असं म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत माझ्यावरून वॉर्नरला अनेक टोमणे ऐकायला लागले, आणि अखेर त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. मला असं वाटतंय की सर्व चूक माझीच आहे, ही गोष्ट माझ्या मनात सलत आहे असं सिडनी संडे टेलीग्राफशी बोलताना वॉर्नरची पत्नी कॅंडिस वॉर्नर म्हणाली.

वर्ष 2008 पर्यंत कॅंडिस रग्बी खेळाडू सोनी बिल याच्यासोबत रिलेशनमध्ये होती, 2015 मध्ये तिचं वॉर्नरसोबत लग्न झालं. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान वॉर्नर आणि आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉक यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी डिकॉकने माझ्या पत्नीबाबत अपशब्द वापरले होते असं वॉर्नर म्हणाला होता. त्यानंतर दुस-या कसोटीच्या वेळीही काही प्रेक्षक रग्बी खेळाडू सोनी बिल विलियम्सचा मुखवटा घालून आले होते. तर काहींनी हा मुखवटा घालून दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या दोन ज्येष्ठ अधिका-यांसोबत फोटो काढला होता.

मी माझ्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये पण डेव्हिडने शक्य तेव्हा माझा आणि मुलांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पतीला आफ्रिकेमध्ये माझ्यावरून टोमणे ऐकायला लागले, मुखवटे घातलेले लोकं त्याने पाहिले. माझ्यावरून लोकांनी गाणीही बनवली आणि हे सर्व वॉर्नरला तिथे सहन करावं लागलं. तो या सगळ्या घडामोडींमुळे तणावात होता असं म्हणत कॅंडिसने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटप्रेमींकडे संयम बाळगण्याची विनंती केली.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटीत बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे.
दुसरीकडे, ‘माझ्यामुळे सगळ्यांनाच कमीपणा आलाय, मी तुमची मान शरमेनं खाली घातली. पण तुमचा विश्वास परत मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रकरणात माझाही तितकाच सहभाग होता याची खंत मला आयुष्यभर सलत राहील’ असं म्हणत साश्रू नयनानं ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरनं चाहत्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली.