‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी थेट संपर्कात असलेला सट्टेबाज किशोर बदलानी ऊर्फ किशोर पुणे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी सकाळी सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. बदलानीच्या अटकेमुळे आयपीएल स्पॉट-फिक्सिंगमधील महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. पाकिस्तानमधील सट्टेबाजांशी बदलानी संपर्कात होता, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
बदलानीचे आयपीएल सट्टेबाजीमध्ये नाव पुढे आल्यानंतर तो गायब झाला होता. त्याच्या पुण्यातील घरी गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी ठाण मांडून होते. परंतु तो युरोपमध्ये गेल्याची माहिती काही नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेरीस तो मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सुरुवातीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले. या मोबाइल फोनचा वापर तो पाकिस्तानातील सट्टेबाजांशी बोलण्यासाठी करीत होता. प्राथमिक चौकशीत आयपीएल सट्टेबाजीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले. बदलानीला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाइल फोनसाठी बदलानीने बनावट कागदपत्रांचा वापर केला होता, असे या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या कोठडी संदर्भातील अर्जात स्पष्ट करण्यात केले आहे.
मयप्पन, विंदू यांच्या जामिनावर आज सुनावणी
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग संघाचा मालक गुरुनाथ मयप्पन, विंदू दारा सिंग, अल्पेश पटेल, प्रेम तनरेजा आदींसह १३ जणांना अटक केली आहे. यापैकी मयप्पन, विंदू दारासिंग, अल्पेश पटेल, प्रेम तनरेजा या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
दाऊद टोळीशी संपर्कात असलेला सट्टेबाज किशोर बदलानी अटकेत
‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी थेट संपर्कात असलेला सट्टेबाज किशोर बदलानी ऊर्फ किशोर पुणे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी सकाळी सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
First published on: 04-06-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood gang linked bookie kishore badlani arrested