भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून दिवस-रात्र कसोटी सामना सुरु होणार आहे. कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर हे दोनही संघ पहिला दिवस-रात्र सामना खेळणार आहेत. भारतीय क्रिकेटमधील या नव्या ‘गुलाबी पर्वा’साठी संपूर्ण कोलकाता शहर सज्ज झाले आहे. भारतातील पहिल्या दिवस-रात्र कसोटीच्या पार्श्वभूमीवर टाकूया या प्रकारातील काही खास कामगिरींवर नजर…
ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ
दिवस-रात्र कसोटीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांची कामगिरी दमदार आहे. क्रिकेटमधील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २७ नोव्हेंबर २०१५ ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. दिवस-रात्र कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ वेस्ट इंडिजने ३ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत, पण त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. इंग्लंडने दिवस-रात्र कसोटीमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये वेस्ट इंडिजला एक डाव आणि २०९ धावांनी पराभूत केले होते.
सर्वाधिक धावा
दिवस-रात्र कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा अजहर अली याच्या नावावर सर्वाधिक ४५६ धावा करण्याचा विक्रम आहे. अलीने ३ दिवस-रात्र कसोटी सामन्यात सुमारे ९१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. महत्त्वाचे म्हणजे एका डावात त्रिशतक ठोकण्याचा विक्रमदेखील अजहर अलीच्या नावावर आहे. दुबईत झालेल्या सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ३०२ धावांची खेळी केली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये अजहर अलीने दिवस-रात्र कसोटीमधील पहिले त्रिशतक झळकावले होते. पाकिस्तानने या सामन्यात ५६ धावांनी विजय मिळवला होता.
याशिवाय, दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (४०५) आहे. तर वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक (२४३ वि. वेस्ट इंडिज) दुसऱ्या स्थानावर आहे.
१५० धावांच्या आत संघ गारद
दिवस-रात्र कसोटी सामन्यात आतापर्यंत झालेल्या एकूण डावांतील ११ वेळा संघ १५० च्या आत बाद झालेला आहे.
यशस्वी गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दिवस-रात्र कसोटीमध्ये सर्वाधिक गडी टिपले आहेत. त्याने ५ सामन्यात २६ गडी टिपले आहेत. ८८ धावा देऊन ५ बळी ही त्याची दिवस-रात्र कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. सर्वाधिक बळींच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड (२१) दुसऱ्या स्थानी आहे.
सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी
दिवस-रात्र कसोटीत एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा फिरकीपटू देवेंद्र बिशू याच्या नावे आहे. त्याने एका डावात पाकिस्तानविरुद्ध ४९ धावा देत ८ बळी टिपले होते. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स २३ धावा देत ६ बळी घेऊन दुसऱ्या स्थानी आहे.
फिरकी की वेगवान गोलंदाज?
दिवस-रात्र कसोटीमध्ये आतापर्यंत वेगवान गोलंदाजांचा दबदबा आहे. ११ कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांनी २५ च्या सरासरीने २५७ बळी टिपले आहेत, तर फिरकिपटूंनी ३१ च्या सरासरीने गोलंदाजी करत ९१ बळी टिपले आहेत.