इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या हंगामात पंच पुनर्आढावा प्रक्रियेचा म्हणजेच डीआरएसचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.

‘डीआरएस’चा वापर व्हावा, यासाठी गेली अनेक वष्रे चर्चा सुरू होती. भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ‘डीआरएस’चा वापर होतो. आता येत्या आयपीएल हंगामपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे शुक्ला यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘डीआरएस’ला बीसीसीआयकडूनच कडाडून विरोध होत होता. मात्र गेल्या दीड वर्षांपासून भारतीय क्रिकेटने आपल्या भूमिकेत बदल करून त्याचे स्वागत केले आहे.

आयपीएलचा ११वा हंगाम ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत रंगणार असून, टाटा नेक्ससतर्फे प्रत्येक सामन्याकरिता ‘सुपर स्ट्रायकर’ हा फलंदाजाला पुरस्कार दिला जाणार आहे. याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम ‘सुपर स्ट्रायकर’लाही सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यात एक हाताने झेल टिपणाऱ्या प्रेक्षकालाही बक्षीस दिले जाणार आहे.

शमीचा निर्णय अहवालानंतर

बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख नीरज कुमार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची चौकशी करीत आहेत. त्यांच्या अहवालाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. तो अहवाल आल्यानंतरच शमीबाबतचा निर्णय घेता येईल, असे शुक्ला यांनी सांगितले. पत्नी हसीन जहाँने हत्येचा प्रयत्न, विषप्रयोग, दिराकडून बलात्कार, पतीचा व्यभिचार असे आरोप केल्यामुळे शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचप्रमाणे अलिश्बा नामक पाकिस्तानी तरुणीकडून शमीने पैसे घेतल्याचा आरोप तिने केला होता. या संशयास्पद व्यवहाराच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार रोखून ठेवला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘शमीच्या खासगी आयुष्याशी आमचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित आरोपांचीच आम्ही चौकशी करीत आहोत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.’’