जागतिक क्रमवारीत महिला संघाची घसरण

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्षाची सांगता जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकावरील मुसंडीने केली आहे, तर महिला संघाची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने गुरुवारी प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचा ४१ वर्षांचा पदकदुष्काळ संपुष्टात आणला. नुकत्याच ढाका येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतही भारताने कांस्यपदक पटकावले. त्यामुळे २२९६.०३८ गुणांसह भारताला ऑस्ट्रेलिया आणि ऑलिम्पिक विजेते बेल्जियम यांच्यापाठोपाठ तिसरे स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर २६४२.२५ गुण जमा आहेत, तर बेल्जियमने २६३२.१२ गुण मिळवले आहेत. नेदरलँड्स आणि जर्मनी यांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे.

महिलांमध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक चौथे स्थान मिळवणाऱ्या भारताला १८१०.३२ गुणांसह नववा क्रमांक मिळाला. नेदरलँड्सने क्रमवारीतील अग्रस्थान मिळवताना ३०१५.३५ गुण मिळवले. इंग्लंडला दुसरे (२३७५.७८ गुण) आणि अर्जेंटिनाला (२३६१.२८ गुण) तिसरे स्थान देण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा चौथा तर, जर्मनीचा पाचवा क्रमांक लागतो.