पीटीआय, शांघाय
एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या दीपिका कुमारीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना नव्या हंगामातील पहिल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह या ऑलिम्पिक प्रकारात वैयक्तिक गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. नव्या हंगामाची सुरुवात भारताने कमालीच्या आत्मविश्वासाने केली असून, स्पर्धेत त्यांची चार पदके निश्चित झाली आहेत. कम्पाऊंड प्रकारात पुरुष, महिला संघ, तसेच मिश्र दुहेरी आणि पुरुष सांघिक अशा चार प्रकारांत भारतीय तिरंदाज अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
तीन वेळा ऑलिम्पिक सहभागानंतरही मधल्या काळातील अपयशी कामगिरीनंतर जागतिक क्रमवारीत १४२व्या स्थानापर्यंत घसरलेल्या दीपिकाने मानांकन फेरीत ३०व्या स्थानावरून मुख्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत तिने कोरियाच्या जेऑन ह्युनयोंगचा १-३ अशा पिछाडीवरून ६-४ असा पराभव केला. लढतीत ३-३ अशी बरोबरी झाल्यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिले नाही. सहा बाणांच्या फेरीत दीपिकाने चार बाण अचूक १० गुणांवर मारून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा >>>VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन
गेल्या वर्षी मातृत्वाच्या विश्रांतीनंतर दीपिकाने या वर्षी पुनरागमन करताना फेब्रुवारीत आशिया चषक स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवली. आता विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी तिला आणखी एका कोरियन स्पर्धकाचे आव्हान परतवावे लागणार आहे. तिची गाठ कोरियाची युवा नेमबाज नाम सुहयेऑनशी पडणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोरियाच्याच अग्रमानांकित लिम शिहेयॉनची गाठ चीनच्यी ली जिआमनशी पडणार आहे.
दरम्यान, अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा या चौथ्या मानांकित भारतीय जोडीला मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित लिम आणि किम वूजीन यांच्याकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला. आता भारतीय जोडी मेक्सिकोच्या जोडीशी कांस्यपदकाची लढत खेळेल. पुरुष एकेरीत अनुभवी तरुणदीप रायला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली.
ज्योती, वर्मा अंतिम फेरीत
कम्पाऊंड तिरंदाजांनी कमालीचे सातत्य राखताना भारताचे चौथे पदक निश्चित केले. ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या अनुभवी जोडीने मेक्सिकोच्या आंद्रेआ बेसेरा-लॉट मॅक्सिमो मेंडेझ ऑर्टिझ जोडीचा १५५-१५१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सुवर्ण लढतीत भारतीय जोडीची गाठ इस्टोनियाच्या दुबळ्या जोडीशी पडणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेपाठोपाठ ज्योतीला हंगामातील पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. ज्योतीने सांघिकबरोबरच वैयक्तिक एकेरीत उपांत्य फेरी गाठली आहे.