ऑलिम्पियाडबाबत आनंदची खंत

चेन्नई : अमेरिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे सलग दुसऱ्यांदा ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न भंगले. पहिला डाव जिंकल्यानंतरही उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागणे निराशाजनक होते, अशी खंत पाच वेळचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केली.

‘‘आम्ही अमेरिकेविरुद्धची लढत जिंकली पाहिजे होती. पहिल्या फेरीत आम्ही मोठय़ा फरकाने बाजी मारली होती. तसेच जेफ्री जिओंगविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलाही चांगला खेळ करण्यात यश आले होते. दुसऱ्या सामन्यात मात्र मला अपेक्षित खेळ करता आला नाही आणि याबाबत मी निराश आहे,’’ असे आनंद म्हणाला.

अमेरिकेविरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव भारताने ५-१ असा जिंकला. यानंतर मात्र भारताने दुसरा डाव आणि बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेली निर्णायक अतिजलद (ब्लिट्झ) लढत गमावली. पण बाद फेरीतील खेळावरून खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही, असे आनंदने स्पष्ट केले.

‘‘कोणत्याही स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन केवळ बाद फेरीतील खेळाने होऊ शकत नाही. बाद फेरीत कोणताही संघ पराभूत होतो. पुढील ऑलिम्पियाडमध्ये आम्ही कामगिरीत नक्कीच सुधारणा करू,’’ असे आनंदने नमूद केले.

युवा पिढीकडून अपेक्षा भारताकडे प्रतिभावान युवा बुद्धिबळपटू मोठय़ा संख्येने असून त्यांच्याकडून आनंदला खूप अपेक्षा आहेत. ‘‘आपल्याकडे युवा बुद्धिबळपटूंची संख्या मोठी आहे. आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन आणि डी. गुकेश यांसारख्या युवकांना चांगली कामगिरी करायची आहे. ते जिद्दी असून विविध स्पर्धांमध्ये खेळत आहेत. त्यांच्यापैकी एक जण भविष्यात जगज्जेता ठरेल अशी आशा आहे,’’ असे आनंद म्हणाला.