दिल्लीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी लंकेच्या खेळाडुंना झालेल्या त्रासामुळे प्रदूषणाचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला.
या प्रकरणात आता आयसीसीने लक्ष घातले असून आगामी बैठकीत दिल्लीतील प्रदूषणाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचे नियोजन योग्य होते का? हा प्रश्नही बैठकीत चर्चिला जाणार आहे.

ही बैठक फेब्रुवारीमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे फिरोजशहा कोटला मैदानाच्या वातावरणासंदर्भातील प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून वैद्यकीय समिती मार्गदर्शन करेल, असे आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. द्विपक्षिय मालिकेत आयसीसीआय हस्तक्षेप करु शकत नाही. मात्र, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपाय योजनेसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.  दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात २ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा आणि अखेरचा कसोटी मालिकेतील सामना खेळवण्यात आला होता.

भारतने ही मालिका १-० अशी खिशात घातली होती. या मालिकेत श्रीलंकन खेळाडू तोंडाला मास्क घालून मैदानात उतरल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. श्रीलंकन खेळाडूंनी प्रदुषणाच्या बहाण्याने विराटला डाव घोषित करण्यास भाग पाडले, अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात रंगली होती.