तुम्हाला पवन नेगी आठवतोय?? आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू. चेन्नईच्या संघावर २ वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर पवनने दिल्ली डेअरडेविल्स आणि रॉयल चँलेजर्स बेंगलोर यांचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र आपल्या खेळापेक्षा आपल्यावर लावण्यात आलेल्या बोलीमुळेच पवन आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिला. हाच धोनीचा वंडरबॉय आता दिल्ली विद्यापीठात प्रवेशासाठी पायपीट करत असल्याचं समजतंय.

आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पवन नेगीने दिल्ली विद्यापीठात स्पोर्ट्स कोट्यामधून अर्ज दाखल केला होता. त्याच्यासोबतच सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स कोट्यामध्ये आपला अर्ज दाखल केला आहे. आता समोर पवन नेगी आहे म्हणल्यावर पहिले संधी त्यालाच मिळणार असा कोणाचाही समज होणं स्वाभाविक आहे. मात्र इथे घडलंय नेमकं उलटं. पवन नेगीच्या एका चुकीमुळे त्याला दिल्ली विद्यापीठात स्पोर्ट्स कोट्यामधून प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. दिल्ली विद्यापीठात एकूण जागांपैकी ५ टक्के जागा या खेळाडूंसाठी राखीव असतात आणि त्यातील १० खेळाडूंना विद्यापीठ थेट प्रवेश देतं. त्या १० जणांच्या यादीत पवन नेगीचं नाव नसल्यामुळे त्याला इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभं राहून अॅडमिशन घ्यावं लागणार आहे.

स्पोर्ट्स कोट्यामधे अर्ज करताना पवनने आपली राष्ट्रीय पातळीवरची प्रमाणपत्र सादर केली होती. मात्र दिल्ली विद्यापीठात आंतराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना प्रवेश दिला जातो. पवन नेगीने आपल्या विजय हजारे करंडकातल्या खेळाची प्रशस्तीपत्र जोडली होती. त्यामुळे पवनला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आपल्या अॅडमिशनसाठी पायपीट करावी लागणार असं दिसतंय.

पवन नेगीचं आंतराष्ट्रीय करिअर हे अवघ्या १ टी-२० सामन्यापुरतं मर्यादीत आहे. २०१६ सालच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत पवन संयुक्त अरब अमिरातविरुद्ध खेळला होता. मात्र या सामन्यातही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. फलंदाजीची संधी न मिळालेल्या पवनला गोलंदाजीतही अवघा १ बळी मिळाला होता. मात्र आयपीएलमध्ये पवनची यंदाच्या हंमागातली कामगिरी चमकदार राहिलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळताना पवनने १६ बळी घेतले होते.