शुक्रवारचा दिवस डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी निराशाजनक ठरला. गतविजेत्या सायना नेहवालला उपांत्यपूर्व फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. युवा गुरुसाईदत्तही पराभूत झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हानच संपुष्टात आले.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आणि पुरेशा विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये परतलेल्या सायना नेहवालला कोरियाच्या जि ह्य़ुन स्युंगकडून १३-२१, २१-१८, २१-१९ असे धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पहिला गेम जिंकत सायनाने चांगली सुरुवात केली. मात्र दुसऱ्या गेममध्ये आक्रमक आणि वेगवान खेळ करत स्युंगने सायनाला निष्प्रभ केले. स्मॅशेसचे फटके, नेटजवळून चांगला खेळ करत सायनाने टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये अटीतटीचा मुकाबला रंगला. प्रत्येक गुणासाठी दोघींमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावत स्युंगने खळबळजनक विजयाची नोंद केली. हातुन घडलेल्या चुकांचा सायनाला फटका बसला. दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे सायनाला यंदाच्या वर्षांत एकाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही.
दरम्यान, पुरुष गटात भारताचा खेळाडू शिल्लक राहिलेल्या आरएमव्ही गुरुसाईदत्तचा तिसऱ्या मानांकित आणि चीनच्या पेंग्यू डय़ूने २१-११, २१-१९ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2013 रोजी प्रकाशित
डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा :सायना, गुरुसाईदत्त पराभूत
शुक्रवारचा दिवस डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी निराशाजनक ठरला.

First published on: 19-10-2013 at 03:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denmark open defending champion saina gurusaidutt ousted