ऑस्ट्रेलियात १९ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा मी प्रतिनिधी होतो. त्याचा फायदा मला १९ वर्षांखालील गटाच्या आगामी तीन देशांच्या क्रिकेट मालिकेत विजय मिळविण्यासाठी होईल, असा आत्मविश्वास भारताच्या १९ वर्षांखालील  संघाचा कर्णधार व महाराष्ट्राचा सलामीवीर विजय झोल याने व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियात या महिन्याच्या अखेरीस १९ वर्षांखालील गटाची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारत या तीन देशांमध्ये स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता विजय झोल याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या १९ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले होते. या संघाकडून खेळताना विजयने सहा सामन्यांमध्ये १५१ धावा केल्या होत्या.
विश्वचषक स्पर्धेतील अनुभवाचा फायदा कर्णधारपद भूषविताना होणार काय असे विचारले असता विजयने सांगितले, भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील खेळपट्टय़ा, वातावरण आदींबाबत खूपच फरक आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या संघांना हेच खरे आव्हान असते. या वातावरणात व जलदगती गोलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना  नेहमीच फायदा मिळतो. तथापि आम्ही तेथे विश्वचषक जिंकला आहे आणि त्यावेळच्या अनुभवामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे. त्यावेळी केलेल्या गृहपाठाचा उपयोग मला भारतीय संघाचे नेतृत्व करताना होणार आहे. या अनुभवामुळे माझ्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण आलेले नाही.
संघाची व्यूहरचना कशी आहे असे विचारले असता विजय म्हणाला, आमचा संघ अतिशय समतोल आहे. आयपीएल स्पर्धा पदार्पण गाजविणारा संजू सॅमसन, तसेच विश्वचषक संघात माझ्याबरोबर खेळणारा मुंबईचा अखिल हेरवाडकर आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा आमच्या संघात समावेश आहे. त्यामुळे आमचा संघ विजेता होईल अशी मला खात्री आहे. विश्वचषक संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करणारे भारत अरुण यांच्याकडेच आमच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो असल्यामुळे आमच्यात चांगला संवाद राहील असे मी निश्चित सांगू शकेन.
वरिष्ठ गटाची पुढची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत खेळण्याचे ध्येय डोळ्यासमोर असले तरी सध्या मी फक्त तीन देशांच्या स्पर्धेवरच लक्ष केंद्रित केले आहे. वरिष्ठ संघात मला निश्चित स्थान मिळेल अशी खात्रीही विजय याने व्यक्त केली.