Dewald Brewis Broke Virat Kohli Record: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेला २ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यासह एडन मारक्रमच्या नेतृत्वाखाली संघाने मालिका १-२ अशी गमावली. पण या मालिकेतील डेवाल्ड ब्रेविसच्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने दमदार खेळी केली. ब्रेविसने अवघ्या २६ चेंडूत ५३ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या खेळीत ब्रेविसने सर्वाधिक ६ षटकार लगावले. याबरोबर त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे.

डेवासल्ड ब्रेविसने दुसऱ्या टी-२० सामन्यात उत्कृष्ट शतकी कामगिरी केली होती आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. आता तिसऱ्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियासमोर ६ षटकार आणि एका चौकारासह ५३ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. ब्रेविसने त्याच्या डावात ६ षटकार लगावताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. पूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

ब्रेविसने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ३ डावात एकूण १४ षटकार मारले आहेत, तर याआधी विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होता. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० क्रिकेटमध्ये १० डावात एकूण १२ षटकार लगावले.

विराट कोहली आता ब्रेविसनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर शिखर धवन आणि आंद्रे रसेल या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० मध्ये ९-९ षटकार लगावले आहेत. रवी बोपारा ३ डावात ७ षटकार मारून यादीत चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये ऑस्ट्रेलियात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

डेवाल्ड ब्रेविस- १४षटकार ३ डाव
विराट कोहली- १२ षटकार- १० डाव
शिखर धवन- ९ षटकार- ८ डाव
आंद्रे रसेल- ९ षटकार- ४ डाव
रवी बोपारा- ७ षटकार- ३ डाव

डेवाल्ड ब्रेविसने बाबर आझमला टाकलं मागे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा बाबर आझमचा विक्रम डेवाल्ड ब्रेविसने मोडला आहे, ज्यामध्ये तो विराट कोहलीचा विक्रम मोडण्यापासून २० धावा दूर होता. या मालिकेत ब्रेविसने एकूण १८० धावा केल्या, तर बाबर आझमने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत एकूण १६३ धावा केल्या. या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या विराट कोहलीने २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत एकूण १९९ धावा केल्या.