Dewald Brevis Record Breaking Century, AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एका खेळीदरम्यान त्याने अनेक मोठे विक्रम मोडून काढले आहेत. बेबी एबी अशी ओळख असणारा डेवाल्ड ब्रेव्हिस फलंदाजीला आला आणि आल्यापासून त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. यादरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी असं काही करून दाखवलं आहे, जे याआधी कोणालाच करता आलं नव्हतं.
दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या टी -२० सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. यादरम्यान त्याने अवघ्या ४१ चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. डेवाल्ड ब्रेव्हिस हा अवघ्या २२ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी टी -२० क्रिकेटमधील दुसरी सर्वात वेगवान खेळी केली आहे. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने अवघ्या १६ चेंडूत पुढील ५० धावा केल्या आणि ४१ चेंडूत विक्रमी शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला.
डेवाल्ड ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. या यादीत डेव्हिड मिलर अव्वल स्थानी कायम आहे. मिलरने ३५ चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. यासह डेवाल्ड ब्रेव्हिसच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठी खेळी ठरली आहे. याआधी हा विक्रम हा हाशिम आम्लाच्या नावावर होता. त्याचे ९७ धावांची खेळी केली होती.
डेवाल्ड ब्रेव्हिसने फाफ डू प्लेसिसचा मोठा विक्रम मोडून काढला आहे. तो दक्षिण आफ्रिकेसाठी टी – २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने डू प्लेसिसचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्याने २०१५ मध्ये ११९ धावांची खेळी केली होती. १२० धावांवर पोहोचताच त्याने हा विक्रम मोडून काढला. पण तो इथेच थांबला नाही, त्याने पुढे १२५ धावांची खेळी केली.