कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपदाचा त्याग करून ते विराट कोहलीकडे सुपूर्द करावे, या महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांच्या मताशी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याने असहमती दर्शवली आहे. ‘‘धोनीच्या नेतृत्वगुणांवर मी फिदा आहे, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. धोनीचे नेतृत्व अद्वितीय आणि कणखर असून त्याने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला आहे. त्याने भारताला कसोटीत अव्वल स्थानी नेण्याची किमयाही साधली आहे,’’ असे गिलख्रिस्टने सांगितले.
भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदासाठी धोनी योग्य नसून त्याने हे कर्णधारपद आता कोहलीकडे सोपवण्याची वेळ आली आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार चॅपेल यांनी म्हटले होते. ‘‘धोनी हा शांत, संयमी आणि अद्वितीय कर्णधार आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनही त्याचा नावलौकिक आहे,’’ असे गिलख्रिस्ट म्हणाला.
२०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच जेतेपदाचा दावेदार आहे, असे गिलख्रिस्टने सांगितले. याबाबत तो म्हणाला, ‘‘जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियासह अन्य तीन-चार जण प्रबळ दावेदार मानले जातात. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान संघाला घरच्या वातावरणाचा फायदा होणार आहे. विराट कोहलीसह भारताने मागील चुकांची पुनरावृत्ती टाळल्यास, भारतीय संघही ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज होईल, असे मला वाटते. भारताची फलंदाजी सक्षम आहे, पण ऑस्ट्रेलियातील चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी करण्यासाठी मानसिक कणखरतेसह भारतीय फलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
धोनीचे नेतृत्व कणखर
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपदाचा त्याग करून ते विराट कोहलीकडे सुपूर्द करावे, या महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांच्या मताशी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याने असहमती दर्शवली आहे.
First published on: 01-11-2014 at 04:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni is a calm and extraordinary character adam gilchrist