Harry Brook Stunning Catch to dismiss Dhruv Jurel Video: भारत आणि इंग्लंड पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. ओव्हलची खेळपट्टी ही गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. भारताची फलंदाजीची सुरूवातही फारशी चांगली नाही आणि पावसाने हजेरी लावलेल्या पहिल्याच दिवशीच भारताने ६ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये ध्रुव जुरेल विचित्रपण बाद झाला.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण अशी फारशी गोलंदाजी केलेली नाही. ओव्हरटन आणि जोश टंगने बरेचसे वाईड चेंडू टाकले आहेत. पण काही चेंडू अगदी योग्य लाईन लेंग्थवर पडल्याने त्यांनी विकेट मिळवले आहेत. भारताकडून फलंदाजांनी छोट्या छोट्या भागीदारी रचल्या. यामुळे भारताने १५० धावांचा टप्पा गाठला.

ध्रुव जुरेल ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये दाखल झाला. जुरेल या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी उतरला. त्याने आक्रमक फटके खेळत चांगली सुरूवात केली. पण नशीबाने साथ न दिल्याने तो विचित्रपणे बाद झाला.

एटकिन्सनच्या ५० व्या षटकात जुरेलने अशी गमावली विकेट

एटकिन्सनच्या ५०व्या षटकात हा प्रकार घडला. एटकिन्सनच्या दुसऱ्या चेंडूवर जुरेल पायचीत झाल्याचं अपील संघाने केलं आणि मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केलं. एटकिन्सनचा चेंडू जुरेलने सोडला आणि त्याच्या पॅडवर जाऊन आदळला. यानंतर मैदानावरील पंचांनी बाद दिल्यानंतर त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू बाहेर जात असल्याने तो नाबाद राहिला.

यानंतर एटकिन्सने पुढचा चेंडू टाकला, अतिरिक्त बाऊन्स मिळाल्याने चेंडू खूप उंचावर आला आणि जुरेल कट मारायला गेला. कट मारलेला चेंडू स्लिपमध्ये गेला, तिथे तैनात असलेल्या ब्रूकने चेंडू फॉलो करत कमालीचा झेल टिपला आणि संघाला विकेट मिळवून दिली. जुरेल आधीच्या चेंडूवर नाबार राहिला आणि नंतर मात्र त्याने एक आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोठी विकेट गमावली.