Neeraj Chopra, Diamond League: डायमंड लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ज्युरिखमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रादेखील जेतेपद मिळवण्यासाठी जोर लावताना दिसून येणार आहे. नीरजने डायमंड लीग स्पर्धेतील २ लेग मध्ये सहभाग घेतला आणि एकूण १५ गुणांची कमाई केली. यासह त्याने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. आतापर्यंत ९०.२३ मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो आणखी लांब थ्रो करून जेतेपद पटकावण्यासाठी पू्र्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो. दरम्यान डायमंड लीग स्पर्धेतील अंतिम सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता पाहता येईल? जाणून घ्या.

नीरजने याआधी २०२२ मध्ये डायमंड लीगची ट्रॉफी उंचावली होती. पण यावेळी गोल्डन बॉयसाठी ही ट्रॉफी जिंकणं मुळीच सोपं नसणार आहे. त्याला अनेक स्टार खेळाडूंकडून तगडं आव्हान मिळू शकतं. जेतेपदासाठी त्याचा सामना जर्मनीच्या जुलियन वेबर, केन्याचा माजी वर्ल्ड चॅम्पियन जुलियस ऐगो आणि ग्नेनाडाच्या अँडरसन पीटरसोबत होणार आहे. पॅरिस लेगमध्ये नीरजने ८८.१६ मीटर लांब थ्रो करून बाजी मारली होती. तर दोहा लेगमध्ये वेबरने ८७.८८ मीटर लांब थ्रो करून नीरजला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता अंतिम फेरीत या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

केव्हा आणि कुठे पाहता येणार लाईव्ह?

डायमंड लीग स्पर्धेतील अंतिम सामना आज (२८ ऑगस्ट) रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११:१५ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नीरज चोप्रासह ७ खेळाड जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ज्यात अँड्रियन मार्डारे, जुलियस येगो, केशोर्न वॉल्कोट, अँडरसन पीटर्स,जुलियन वेबर आणि सायमन वीलेंड यांचा समावेश आहे.

नीरजने याआधी २०२२ डायमंड लीग स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. त्याने स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने ८८. ४४ मीटर लांब थ्रो करून जेतेपदाला गवसणी घातली होती. यावेळीही नीरज चोप्रा जेतेपदाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.