राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी दिमाखदार कामगिरी केली. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांपुढचे आव्हान खडतर असणार आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे पदकांसाठी नेमबाजांवर भरवसा ठेवला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सातत्याने चांगले प्रदर्शन करणे कठीण असल्याचे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त नेमबाज आणि संघटक अशोक पंडित यांनी व्यक्त केले.
ल्ल राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजपटूंनी १७ पदकांसह अभिमानास्पद कामगिरी केली. ग्लासगो ते इन्चॉन या टप्प्यात आव्हानात किती बदल होईल?
खूपच फरक पडेल. राष्ट्रकुलच्या तुलनेत २५ टक्के पदके आपण पटकावली तरी ते समाधानकारक असेल. स्पेनमध्ये झालेल्या नेमबाजी विश्वचषकात आपण केवळ एक पदक पटकावू शकलो. अव्वल दहामध्ये चीन, कोरियाच्या खेळाडूंचा समावेश होता. हेच सर्व खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांसमोर उभे ठाकणार आहेत. दिवास्वप्न बाळगणे योग्य नाही. अवघ्या एका गुणामुळे नेमबाज पात्रता फेरीतूनच बाहेर फेकला जातो. आशियाई स्पर्धा प्रतिऑलिम्पिक आहे, त्यामुळे मुकाबला खडतर असेल.
*यंदाच्या वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक खेळाडूंना दमवणारे आहे. त्याविषयी काय सांगाल?
प्रवास हा मुद्दा नेमबाजांसाठी त्रासदायक ठरतो. नेमबाजपटूंना शस्त्रास्त्रे आणि ते नेण्यासाठीचे आवश्यक परवाने घेऊन वावरावे लागते. दहशतवाद तसेच अन्य हिंसक घटनांमुळे शस्त्र म्हटले की तपासणी सुरू होते. ही शस्त्रे समाजविरोधी नसून क्रीडाप्रकाराचा भाग आहेत हे पटवून द्यावे लागते. त्यात बराच वेळ जातो. काही वेळेला खेळाडू स्पर्धेच्या ठिकाणी आणि त्याची आयुधे विमानतळावरच अशी अवस्था होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मातब्बर खेळाडूंना टक्कर देण्यासाठी मानसिक शांततेची गरज असते. मात्र या तांत्रिक सोपस्कारांमध्येच वेळ जातो, लक्ष विचलित होते. अन्य देशांचे खेळाडू फक्त खेळण्याचे काम करतात, आपल्या खेळाडूंना तशी सुविधा मिळाली तर कामगिरी नक्कीच उंचावेल. राष्ट्रकुल, नेमबाजी विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धा एका महिन्यात होत आहेत. नेमबाजी एकाग्रतेचा खेळ आहे. भिन्न परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही.
*भारतीय नेमबाजी विश्वात संक्रमणाचा टप्पा सुरू झाला आहे का?
हे एक महत्त्वाचे स्थित्यंतर आहे. देशभरात सगळीकडे असंख्य युवा खेळाडू नेमबाजीकडे वळताना दिसत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंमध्ये युवा पिढीचे प्रतिनिधी मोठय़ा प्रमाणावर होते. युवा खेळाडूंमध्ये सळसळती ऊर्जा असते, उत्साह वयानुरूप असतो. वरिष्ठ नेमबाज अनुभवी असले तरी ही ऊर्जा आणू शकत नाहीत. त्यामुळे हा बदल स्वाभाविक आहे. अभिनव बिंद्रा, गगन नारंगने जपलेला वसा पुढे नेण्याची जबाबदारी जितू राय, राही सरनोबत, हिना सिद्धू, अपूर्वी चंडेला या युवा खेळाडूंवर आहे.
*आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्य खेळांपेक्षा नेमबाजीवर पदकांसाठी अतिरिक्त जबाबदारी आहे?
सरकारने नेमबाजीसाठी प्रचंड निधी उपलब्ध करून दिला आहे. स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार आशादायी आहे. या मदतीचे सकारात्मक परिणाम नेमबाजांच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनात दिसून येतो. कौशल्याला मेहनतीची जोड देत सर्वोत्तम कामगिरी करणारा चमू अशी नेमबाजी पथकाची ओळख आहे. त्यामुळे पदकासाठी त्यांची चर्चा होणे स्वाभाविक आहे.