अंधेरीत चालू असलेल्या राज्य जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
पोल, अनइव्हन बार, अॅप्रेटस, व्होल्ट, बॅलन्स बीम, फ्लोअर, लॅण्डिंग या अवघड शब्दांचा उपयोग करत वावरणारी मुले-मुली.. त्याच शब्दांना जागत सादर होणारे सुरेख सादरीकरण.. त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक तसेच व्यवस्थापक.. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल खेळांच्या वयोगट स्पर्धाना असते तशी गर्दी आणि उत्साह अंधेरीतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्य जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने दिसत आहे.
पाहताना नेत्रदीपक, मात्र समजण्यास आणि खेळायला अवघड असे जिम्नॅस्टिक्स मुख्य खेळांच्या भाऊगर्दीत दुर्लक्षित राहते. क्रीडा विश्वाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरच्या यशाने मात्र सगळी समीकरणे बदलली. त्रिपुरासारख्या छोटय़ाशा राज्यातल्या दीपाने जगातल्या अव्वल खेळाडूंना टक्कर देत मिळवलेल्या यशाने प्रामुख्याने पालकांचा या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे चित्र या स्पर्धेत जाणवले.
‘‘किशोर, कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रकारांत महाराष्ट्राची मुले-मुली सातत्यपूर्ण प्रदर्शन करत असतात. दीपाच्या दिमाखदार प्रदर्शनामुळे सहभागी खेळाडूंमध्ये झालेली वाढ सकारात्मक आहे. नांदेड, चंद्रपूर अशा राज्यांच्या कानाकोपऱ्यातून साडेतीनशेहून अधिक मुले-मुली सहभागी झाले आहेत,’’ असे महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी सांगितले.
‘‘या खेळातही कारकीर्द घडवता येऊ शकते असा विश्वास पालकांना वाटू लागला आहे. हा बदल महत्त्वाचा आहे. जिम्नॅस्टिक्स उपकरणांचा खर्च प्रचंड असतो. सादरीकरणासाठी विशिष्ट आकाराच्या सभागृहाची आवश्यकता असते. अशा सुविधा खासगी क्लब्स, जिमखाने उपलब्ध करून देत आहेत. ज्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचे आव्हान पेलू शकतो,’’ असे जोशी यांनी सांगितले.
याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक हरीश परब म्हणाले, ‘‘जिम्नॅस्टिक्स हा वेगळ्या स्वरूपाचा खेळ असतो. बॉक्सिंग किंवा कुस्तीप्रमाणे शारीरिक संपर्क नाही आणि गुणांकन पद्धतीही भिन्न असते. काठिण्य आणि कार्यान्वयन अशा दोन पातळ्यांवर सादरीकरणाचे मूल्यमापन केले जाते. केवळ कौशल्य पुरेसे होत नाही तर घोटीवपणा आवश्यक असतो. जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण सहज उपलब्ध नसतानाही स्पर्धाना मिळणारा प्रतिसाद आश्वासक आहे.’’