ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात भारताला पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार म्हणजे नेमबाजीच आहे, हे लंडन ऑलिम्पिकद्वारे पुन्हा सिद्ध झाले. विजयकुमार याने रौप्यपदक, तर गगन नारंग याने कांस्यपदक मिळवत त्यावर शिक्कामोर्तब केले. नेमबाजीमधील भारताची ही चढती कमान खरोखरीच या खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
अॅथेन्स येथे २००४मध्ये राज्यवर्धन सिंह राठोड याने नेमबाजीत रौप्यपदक मिळविले होते, त्या वेळी या खेळाची फारशी दखल कोणी घेतली नव्हती. मात्र, २००८मध्ये अभिनव बिंद्राने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर या खेळात आपल्याला एवढे मोठे यश मिळू शकते, याची जाणीव देशातील क्रीडा संघटकांना आणि शासनाला झाली. या यशावर कळस चढविला विजयकुमार व नारंग यांनी. त्यांच्या कामगिरीने या खेळाबद्दल घराघरात चर्चा होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडू या क्रीडा प्रकाराकडे वळू लागले आहेत, ही या खेळाच्या लोकप्रियतेची पावतीच आहे.
अभिनव बिंद्रा व विश्वविक्रमवीर रंजन सोधी हे लंडन ऑलिम्पिकसाठी संभाव्य पदक विजेते मानले जात होते. नेमबाजीत कसून सरावाबरोबरच थोडीशी नशिबाची साथही महत्त्वाची मानली जाते. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी तुम्ही कशी कामगिरी करता, यावरच पदक अवलंबून असते. बीजिंग ऑलिम्पिक विजेत्या अभिनव याला १० मीटर एअर रायफल या हुकमी क्रीडाप्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविता आले नाही. खरंतर अभिनव हा एकाग्रतेने सराव करणारा नेमबाज. मात्र प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी तो अपेक्षेइतकी कामगिरी करू शकला नाही. अभिनवप्रमाणेच सोधी हादेखील निराशाजनक कामगिरीचा धनी ठरला. त्याने ऑलिम्पिकपूर्वी जेमतेम एक महिना अगोदर जागतिक स्पर्धेत रुपेरी यश मिळविले होते. मात्र ‘डबल ट्रॅप’ या त्याच्या हुकमी क्रीडाप्रकारात प्राथमिक फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.
या पाश्र्वभूमीवर विजयकुमारचे यश खरोखरीच नेत्रदीपक ठरले. त्याची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा असूनही त्याने कोणतेही दडपण न घेता सुरेख कामगिरी साकारली. २५ मीटर रॅपिड फायरमध्ये त्याने रौप्यपदक मिळवीत पदार्पण सार्थ ठरविले. सुवर्णपदकापासून तो थोडासा वंचित राहिला. त्याने दाखविलेली एकाग्रता, जिद्द व आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. कारण त्याने हे यश मिळविताना अनेक मातब्बर खेळाडूंना पिछाडीवर टाकले. विजयकुमारने अलीकडेच जागतिक क्रमवारीत दुसरे मानांकनही मिळविले आहे. सेनादलात नोकरी करणाऱ्या विजयकुमार याला ऑलिम्पिक पदकाबद्दल बढती देण्याबाबत थोडेसे वादंग निर्माण झाले, मात्र तो भारताचा भावी ऑलिम्पिक विजेता खेळाडू होऊ शकेल, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे, हे त्याने दाखवून दिले आहे.
अभिनवचा हुकमी क्रीडाप्रकार असलेल्या १० मीटर एअर रायफलमध्ये नारंग याने कांस्यपदक मिळवीत आपले ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार केले. गेली अनेक वर्षे हे पदक मिळविण्यासाठी तो झगडत होता. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदकांची लयलूट केली होती, मात्र गेली दहा वर्षे त्याला ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली होती. यंदा मात्र त्याने अतिशय कसून सराव केला व आपली तपश्चर्या सार्थकी लावली.
नारंग व विजयकुमार यांच्या यशात पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडानगरीचा मोठा वाटा आहे. या संकुलात असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळेच नारंग याने येथेच नेमबाजी अकादमी सुरू केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवीत नारंग, विजयकुमार तसेच भारतीय संघातील अनेक नेमबाजांनी याच अकादमीत अनेक महिने मुक्कामच ठोकला होता. त्यांना परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही फायदा मिळाला.
भारताचे आशास्थान असलेला जॉयदीप कर्माकर याचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न थोडक्यात हुकले. ५० मीटर रायफल प्रोनमध्ये त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये राही सरनोबत, हीना सिधू, शगुन चौधरी यांना अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. ऑलिम्पिकमध्ये या खेळाडू नवोदित असल्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमधील अनुभव त्यांच्याकरिता भावी काळातील पदकासाठी शिदोरीच ठरणार आहे.
नेमबाजीमधील भारतीय खेळाडूंचे यश लक्षात घेऊन शासनाबरोबरच पुरस्कर्त्यांचाही या खेळाबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक होत चालला आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकसाठी तीन-चार वर्षे सलग प्रायोजकत्व मिळाले आहे. काही उद्योजकांनी नवोदित खेळाडूंना दत्तकही घेतले आहे. खेळाडूंना परदेशी स्पर्धामधील सहभाग, फिजिओ, अकादमीत परदेशी प्रशिक्षकाद्वारे मार्गदर्शन आदी खर्चाची जबाबदारी उचलणारे प्रायोजक पुढे येऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी खेळाडूंना नेमबाजीसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीबाबत खूप समस्या येत असत. आता या समस्या दूर झाल्या आहेत. ऑलिम्पिक सरावाकरिता किती साधनसामग्री लागणार आहे याचे योग्य नियोजन होऊ लागले आहे आणि त्याची अंमलबजावणीही होऊ लागली आहे. नेमबाजीला लागणारी साधनेही सहज उपलब्ध होऊ लागली आहेत.
नेमबाजी हा खेळ कोणत्याही एका विशिष्ट खेळाडूपुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण भागातील तसेच शहरातील कमी उत्पन्न गटातील पालकही या खेळात आपल्या मुलामुलींना घालू लागले आहेत. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धामध्ये दीड हजार खेळाडू भाग घेतात. ही किमया केवळ ऑलिम्पिक पदकांमुळेच झाली आहे. आणखी चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी नेमबाजांनी आतापासूनच सुरू केली आहे हे या खेळाच्या प्रगतीचे द्योतकच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2012 रोजी प्रकाशित
ऑलिम्पिक पदकाचा ‘दुहेरी नेम’!
ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात भारताला पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार म्हणजे नेमबाजीच आहे, हे लंडन ऑलिम्पिकद्वारे पुन्हा सिद्ध झाले. विजयकुमार याने रौप्यपदक, तर गगन नारंग याने कांस्यपदक मिळवत त्यावर शिक्कामोर्तब केले.

First published on: 23-12-2012 at 01:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double target of olympic medals