Drone Attack On PSL 2025 Rawalpindi Stadium: पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ज्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळालेली नाही, त्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र, आता परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक व्हिडीओनुसार , भारताचं एक ड्रोन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला जाऊन धडकलं असल्याचा दावा केला जातोय.

भारत -पाकिस्तानात सध्या तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानची चांगलीच झोप उडवली. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्ध्वस्त केली आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. आज पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत महत्वाचा सामना खेळला जाणार होता. या सामन्यात पेशावर जाल्मी आणि कराची किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार होते. या सामन्यापूर्वी भारताचं ड्रोन रावळपिंडी स्टेडियमला जाऊन धडकलं अशल्याची माहिती समोर येत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, या ड्रोन हल्ल्यामुळे स्टेडियमजवळ असलेल्या एका इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतातील १५ शहरांवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रावळपिंडी स्टेडियमवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं ठिकाण बदलावं लागलं आहे.

रावळपिंडी स्टेडियमवर आज पेशावर जाल्मी आणि कराची किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सामना होणार होता. मात्र, आता हवाई हल्ला झाल्याने खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने याबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठक देखील बोलावली होती.

कराचीमध्ये होणार सामन्यांचे आयोजन

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा देखील शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. रावळपिंडीमध्ये हल्ला झाल्यानंतर आता उर्वरीत सामने कराचीमध्ये खेळवले जाऊ शकतात. तर दुसरा पर्याय म्हणून, या स्पर्धेतील उर्वरीत सामने परदेशात देखील खेळवले जाऊ शकतात.

यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सांगितले होते की, पाकिस्तान सुपर लीगच्या वेळापत्रकात कुठलाही बदल होणार नाही. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डला माघार घेऊन आपला निर्णय बदलावा लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.