प्रो कबड्डी लीगमधील उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची लढाई अधिक तीव्र झाली असताना भारताचा कर्णधार राकेश कुमार उर्वरित सर्व सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दुखापतीमुळे राकेश प्रो कबड्डीमधील त्याचा संघ पाटणा पायरेट्सचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही, असे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. मात्र त्याच्या दुखापतीबाबत कबड्डी वर्तुळात वेगळीच चर्चा रंगते आहे.
प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात सर्वाधिक १२ लाख ८० हजार रुपयांची बोली जिंकत राकेशने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे पाटणा पायरेट्सच्या कर्णधारपदाची धुरा तो समर्थपणे सांभाळत होता. प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात पाटणाची सुरुवात सावध झाली. पाटण्याच्या पाटलीपुत्र क्रीडा संकुलावरील घरच्या मैदानावर पहिल्याच सामन्यात तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सला हरवले. तो राकेशचा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना ठरला. कारण पुढील सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी संदीप नरवालकडे सोपवण्यात आली. त्यानंतर मात्र पाटणा पायरेट्सचे नशीब पालटले. त्यांनी दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटणला हरवले, तर बंगाल वॉरियर्सला बरोबरीत रोखले. मग हैदराबादच्या गचीबाऊली स्टेडियमवर तेलुगू टायटन्सला धूळ चारणे पाटणा पायरेट्सला कठीण गेले, मात्र दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलात त्यांनी बंगळुरू बुल्सला हरवण्याची किमया साधली. पाटण्याचा संघ एकीकडे उपांत्य फेरीसाठी आपला दावा मजबूत करीत असताना राकेश मात्र संघात नसल्याबद्दल क्रीडाशौकिनांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पाटणा पायरेट्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार राणा यांनी सांगितले की, ‘‘दुखापतीमुळे राकेश पुढील सामन्यांत खेळू शकणार नाही. परिणामी, उर्वरित हंगामालाच त्याला मुकावे लागणार आहे. प्रो कबड्डीच्या नियमानुसार राकेश दोन वर्षांसाठी करारबद्ध असल्यामुळे तो करारही यंदाच्या हंगामासोबत संपणार आहे.’’
राणा यांनी आपल्या प्रतिक्रियेतूनच राकेश यानंतर पाटणा संघाकडून दिसणार नसल्याचे संकेत दिले आहेत. कारण प्रो कबड्डीने सर्व खेळाडूंना पहिल्या दोन हंगामांसाठी करारबद्ध केले आहे. पुढील हंगामासाठी स्वतंत्र लिलाव प्रक्रिया होणार आहे. राकेश दुखापतीमुळे खेळत नसल्याचे अधिकृत कारण पाटणा पायरेट्सने दिले असले तरी पाटण्यामध्ये राकेशचे संघव्यवस्थापनाशी काहीतरी बिनसल्याची चर्चा कबड्डी क्षेत्रात आहे. दरम्यान, भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी राकेशला कोणतीही दुखापत झाली नसून, तो खेळणार असल्याचे सांगून या प्रकरणाचे गूढ आणखी वाढवले आहे. हैदराबादच्या टप्प्यात प्रो कबड्डीमधील सहभागी खेळाडूंची दुसऱ्यांदा वजन चाचणी झाली होती. राकेश पाटण्याच्या सामन्यात खेळला नाही, तसेच वजन चाचणीलाही अनुपस्थित होता. त्यामुळे राकेश उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, हे तांत्रिकदृष्टय़ा स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या हंगामातील कामगिरी
प्रतिस्पर्धी चढायांचे गुण पकडींचे गुण
यु मुंबा ० ०
बंगळुरू बुल्स ४ २
जयपूर पिंक पँथर्स ७ १
तेलुगू टायटन्स ३ ०
एकूण १४ ३