भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धापैकी एक म्हणजेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे नवे पर्व १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे; परंतु यंदा अंतिम सामना वगळता एकाही लढतीचे थेट प्रक्षेपण चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. त्याशिवाय गेले तीन हंगाम गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात खेळल्यानंतर या वेळी पुन्हा लाल रंगाच्या चेंडूने फक्त दिवसाचे सर्व सामने खेळले जाणार आहेत.

१७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान बेंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या या स्पर्धेत नेहमीप्रमाणे इंडिया रेड, इंडिया ब्लू आणि आणि इंडिया ग्रीन या संघांचा समावेश असेल. भारताचा प्रतिभावान युवा फलंदाज शुभमन गिलकडे इंडिया ब्लूचे कर्णधारपद सोपवली आहे, तर विदर्भाच्या फैझ फझलवर इंडिया ग्रीनच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. इंडिया रेडचे नेतृत्व प्रियांक पांचाळ करणार आहे.

‘‘चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रकाशाची पुरेशी व्यवस्था असली तरी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण नसल्यामुळे आम्ही यंदा गुलाबी चेंडूने दिवस-रात्र सामने न खेळवता लाल चेंडूने दिवसाच्या सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्यामुळे ती लढत दिवस-रात्र खेळवण्याचा आमचा विचार चालू आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यकारी व्यवस्थापक साबा करिम म्हणाले.

महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी उत्तम संधी

ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, तुषार देशपांडे, सिद्धेश लाड, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे, अक्षय वाखरे यांसारखे रणजी स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू दुलीप करंडक स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्थानिक हंगामाच्या सुरुवातीला चोख कामगिरी करून भारतीय संघाचे दार ठोठावण्यासाठी महाराष्ट्रातील हे खेळाडू उत्सुक आहेत.