करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. भारतामध्येही बीसीसीआय आणि अन्य महत्वाच्या क्रीडा संघटनांनी स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. त्यामुळे नेहमी मैदानावर असणारे भारतीय संघाचे खेळाडू सध्या घरात आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मुंबईकर श्रेयस अय्यरही याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघ मे महिन्यानंतर मैदानात उतरेल, मात्र त्याआधीच श्रेयसला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचे वेध लागलेले आहेत.

ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना, एका चाहत्याने श्रेयसला कसोटी क्रिकेटबद्दल त्याचं मत विचारलं. यावर उत्तर देताना श्रेयस म्हणाला, “कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचं ते स्वप्न असतं. मी देखील भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याची वाट पाहतो आहे.” सध्याच्या घडीला श्रेयस भारताच्या वन-डे आणि टी-२० संघाचा सदस्य आहे. मात्र कसोटी संघात त्याला अद्याप स्थान मिळवता आलेलं नाही. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतो.

दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलबद्दल अजुनही आशावादी आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जाऊ शकतो असं रोहित शर्माने म्हटलं आहे.