मुंबईकर क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवली. विराटने शार्दुलला चौथ्या कसोटीत संघात घेतले आणि शार्दुलनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने दोन्ही डावात अर्धशतक ठोकले शिवाय गोलंदाजीतही कमाल केली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीनंतर समालोचक हर्षा भोगले यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे.

हर्षा भोगले आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”शार्दुल आता पालघरची ट्रेन हाताच्या इशाऱ्याने थांबवू शकतो.” शार्दुलने सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने अर्धशतकवीर बर्न्सला बाद केले. इतकेच नव्हे, तर इंग्लंडचा किल्ला लढवणारा कर्णधार जो रूटचा अडथळाही दूर केला.

 

ओव्हलवर भारताचा विजय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

 

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.