इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.

हेही वाचा – ENG vs IND : वेग १४३ किमी…गोलंदाज बुमराह…बॉल ‘यॉर्कर’ अन् निकाल अर्थात ‘क्लीन बोल्ड’! पाहा VIDEO

१९७१चा विजय

भारतीय संघाने या मैदानात शेवटचा विजय ऑगस्ट १९७१ मध्ये मिळवला होता. या सामन्याचे नेतृत्त्व अजित वाडेकर यांच्या हाती होते. १९७१ मध्ये १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान हा सामना खेळला गेला.  इंग्लंडने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघ पहिल्या डावात २८४ धावा करू शकला. मात्र दुसऱ्या डावात भारतीय गोंलदांजांनी कमाल केली. भागवत चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाही. संपूर्ण इंग्लंडचा संघ १०१ या धावसंख्येवर बाद झाला. भारताला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य मिळालं होते. भारताने ६ गडी गमवून हे लक्ष्य गाठले.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मैदानात दोन कसोटी सामने खेळला होता. दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. धोनीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला होता. भारताने या मैदानावरील लढत ११८ धावांनी गमावली होती. पण विराटने आता या पराभवाचा बदला घेतला आहे.

ओव्हल मैदानावर भारत

  • १९४६: सामना ड्रॉ
  • १९५२: सामना ड्रॉ
  • १९५९: इंग्लंडकडून भारताचा १ डाव आणि २७ धावांनी पराभव.
  • १९७१: भारताने ४ विकेट्सनी विजय मिळवला.
  • १९७९: सामना ड्रॉ
  • १९८२: सामना ड्रॉ
  • १९९०: सामना ड्रॉ
  • २००२: सामना ड्रॉ
  • २००७: सामना ड्रॉ
  • २०११: इंग्लंडने भारताचा १ डाव आणि ८ धावांनी पराभव केला.
  • २०१४: इंग्लंडने भारताचा १ डाव आणि २४४ धावांनी पराभव केला.
  • २०१८: इंग्लंडने भारताचा ११८ धावांनी पराभव केला.
  • २०२१: भारताने इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव केला.