भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या खराब फलंदाजीमुळे चर्चेत आहे. २०१९पासून विराटला शतकी खेळी करता आलेली नाही. केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात विराट चांगल्या लयीत दिसत होता. मालिकेत त्रास देणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह खेळत आपला इरादा स्पष्ट केला होता. पण तो अर्धशतक पूर्ण करायच्या आतच बाद झाला.
इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने विराटला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्रेग ओव्हर्टनकरवी झेलबाद केले. विराटला ७ चौकारांसह ४४ धावा करता आल्या. अर्धशतक आणि सोबतच शतकाने पुन्हा हुलकावणी दिल्यानंतर विराट संतापला होता. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्याने रागाच्या भरात आपला हात जोरात झटकला.
It hurts more than anything #viratkohli #IndvsEng pic.twitter.com/Gti8GA9BUT
— Anjali Sharma (@Anjali_vk_18) September 5, 2021
हेही वाचा – ENG vs IND : एका डोळ्यात हसू अन् दुसऱ्यात आसू; विराटनं केली मोठ्या विक्रमाची नोंद, पण…
विराटने या कसोटीच्या पहिल्या डावात ५० धावा केल्या. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावांमध्ये ९४ धावा केल्या. नोव्हेंबर २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो शतक झळकावू शकला नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या.
टीम इंडियाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात १९१ धावा केल्या, तर इंग्लंडने २९० धावा केल्या. अशा प्रकारे यजमान इंग्लंडला ९९ धावांची आघाडी मिळाली आहे. पण टीम इंडियाला सामन्यात विजयी आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला किमान ३०० धावांचे लक्ष्य द्यावे लागेल. टीम इंडिया २००७पासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही.