Farhan Ahmed Hattrick: इंग्लंडमध्ये क्रिकेटची जत्रा भरली आहे. भारताचा संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. भारतीय महिला संघ, १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंडमध्ये आहे. यासह इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. यासह इंग्लंडची टी -२० लीग स्पर्धा टी -२० ब्लास्ट स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. इंग्लंडचा युवा गोलंदाज फरहान अहमदने हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

इंग्लंडमध्ये टी -२० ब्लास्ट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत १८ जुलै रोजी झालेल्या सामन्यात लंकाशायर आणि नॉटिंघमशायर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात १७ वर्षीय गोलंदाजी फरहान अहमदने हॅट्ट्रिक घेतली आहे. फरहान अहमद हा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज रेहान अहमदचा छोटा भाऊ आहे. या दमदार कामगिरीसह तो टी -२० ब्लास्ट स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा नॉटिंघमशायर संघातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. फरहान अहमद हा नवखा गोलंदाज आहे त्याला आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३८ गडी बाद केले आहेत.

फरहान अहमदची गोलंदाजी ही नॉटिंघमशायर संघासाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्याने ४ षटकात अवघ्या २५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यासह त्याने लंकाशायरचा निम्मा संघ तंबूत धाडला. फरहानला साथ देत लियाम पेटरसन आणि व्हाईट यांनी प्रत्येक २–२ गडी बाद केलेबाद केले. यासह लंकाशायरच संपूर्ण डाव अवघ्या १२६ धावांवर आटोपला.

नॉटिंघमशायर संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नॉटिंघमशायर संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. नॉटिंघमशायर संघातील ४ फलंदाज अवघ्या १४ धावसंख्येवर तंबूत परतले होते. पण आव्हान फार मोठं नसल्याने नॉटिंघमशायरच्या फलंदाजांनी डाव सावरला. नॉटिंघमशायरकडून टॉम मूर्सने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर नॉटिंघमशायर संघाने हा सामना १५.२ षटकात आपल्या नावावर केला.

या सामन्यातील पहिल्या डावात फरहान अहमदने गोलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर फलंदाजी करताना टॉम मूर्स चमकला. त्याने ४ षटकार आणि ७ चौकारांसह ७५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने नॉटिंघमशायर संघाचा विजय निश्चित करून दिला. शेवटी फलंदाजी करताना डॅनियल सॅम्सने ९ चेंडूंत १७ धावा कुटल्या. यासह नॉटिंघमशायर संघाला विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.