‘अव्वल-१२’ फेरीचा विजयारंभ करण्यासाठी इंग्लंड-वेस्ट इंडिज उत्सुक

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे जेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार मानले जाणारे संघ शनिवारी एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. दुबईचे मैदान फलंदाजीसाठी सर्वाधिक पोषक असल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल-१२’ फेरीच्या पहिल्या गटातील लढतीत कोणता संघ षटकारांच्या आतषबाजीसह विजयी सुरुवात करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात विंडीजने इंग्लंडला नमवून दुसऱ्यांदा जगज्जेदेपद मिळवले होते. या धक्क्यातून सावरत इंग्लंडने २०१९चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. बेधडक खेळ, अष्टपैलूंचा भरणा आणि खालच्या क्रमांकांपर्यंतची फलंदाजी या त्रिसूत्रीवर दोन्ही संघांचा विश्वास असल्याने चाहत्यांना शनिवारी मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.

फलंदाजीत स्थैर्याची गरज

विंडीजच्या संघात कर्णधार किरॉन पोलार्डसह ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असला तरी दोन्ही सराव सामन्यांत त्यांना १५० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यामुळे विंडीजच्या फलंदाजांना आक्रमकतेबरोबरच खेळपट्टीवर टिकून राहण्याचेही भान राखावे लागेल. त्यांच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता असली तरी ड्वेन ब्राव्हो मोलाची भूमिका बजावू शकतो. बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज रवी रामपॉलकडे सर्वांचे लक्ष असेल.

गोलंदाज भवितव्य ठरवणार

इंग्लंडच्या संघात जोस बटलर, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो असे एकहाती सामने फिरवणारे फलंदाज आहेत. मात्र बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या गोलंदाजीतील धार कमी झाली आहे. कर्णधार ईऑन मॉर्गनसुद्धा लय मिळवण्यासाठी चाचपडत असून मोईन अली आणि आदिल रशीद या फिरकीपटूंची जोडी इंग्लंडसाठी निर्णायक ठरेल. पहिल्या सराव लढतीत भारताकडून पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला नमवून विंडीजला इशारा दिला आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी