श्रीलंका-इंग्लंड कसोटी मालिका

गॉल : फिरकीपटू मोईन अली, आदिल रशीद आणि जॅक लीच या तिघांनी दुसऱ्या डावातही केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेला तब्बल २११ धावांनी धूळ चारली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या ४६२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा दुसरा डाव २५० धावांवर संपुष्टात आला. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या रंगना हेराथला विजयी निरोप देण्यात श्रीलंकेचा संघ मात्र अपयशी ठरला.

दुसऱ्या डावात किटॉन जेनिंग्सने साकारलेल्या धडाकेबाज नाबाद १४६ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने ३२२ धावांपर्यंत मजल मारली. बेन स्टोक्स (६२) व जॉस बटलर (३५) यांनीही सुरेख योगदान दिल्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेला ४६२ धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या डावात एक गडी बाद करणाऱ्या हेराथने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिले.

मात्र, फलंदाजीत श्रीलंकेने दुसऱ्या डावातही निराशा केली. दिमुथ करुणारत्ने (२६), धनंजय डी सिल्व्हा (२१) आणि कुश मेंडिस (४५) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करणे जमले नाही. फिरकीपटू मोईनने दुसऱ्या डावातही चार बळी मिळवत संपूर्ण सामन्यात एकूण आठ गडी बाद केले. अँजोलो मॅथ्यूजने (५३) दिलेली एकतर्फी झुंज संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. अखेरीस स्टोक्सने फोक्सच्या साहाय्याने हेराथला ५ धावांवर धावचीत करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (दुसरा डाव) : ९३ षटकांत ६ बाद ३२२ (डाव घोषित)

श्रीलंका (दुसरा डाव) : ८५.१ षटकांत सर्व बाद २५० (अँजोलो मॅथ्यूज ५३, कुशल मेंडिस ४५; मोईन अली ४/७१).