गोलंदाजांच्या दिमाखदार एकत्रित कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४२ धावांत गुंडाळला आणि अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत १६९ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या शतकाच्या बळावर ४३० धावांची मजल मारली. रूटने १७ चौकारांसह १३४ धावांची खेळी केली. गॅरी बॅलन्स, बेन स्टोक्स आणि मोइन अली यांनी अर्धशतकांसह रुटला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने ५ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०८ धावांतच आटोपला. ख्रिस रॉजर्सने ९५ धावा केल्या. इंग्लंडला १६९ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात २६९ धावा केल्या. इयान बेल आणि जो रूट यांनी प्रत्येकी ६० धावा केल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ४१२ धावांचे आव्हान ठेवले. हे लक्ष्य गाठण्यासाठी किंवा सामना अर्निणित राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे दोन दिवसांचा कालावधी होता. मात्र चौथ्या दिवशी उपाहारानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली. इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव २४२ धावांत गुंडाळला. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ आणि मायकेल क्लार्क अध्र्या तासाच्या अंतरात माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव पक्का झाला. मिचेल जॉन्सनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉड आणि मोइन अली यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. दोन्ही डावात मिळून १९४ धावा आणि २ बळी घेणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.