न्यू यॉर्क : अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या लढतींचे स्वरूप बदलण्यात आले असले, तरी सारा एरानी आणि आंद्रेया वावासोरीचे वर्चस्व कायम राहिले. एरानी-वावासोरी या इटलीच्या जोडीने सलग चार सामने जिंकताना अमेरिकन स्पर्धेतील जेतेपद राखले.
एकेरीतील आघाडीच्या खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी यंदा अमेरिकन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या लढती नव्या रूपात खेळविण्यात आल्या. स्पर्धेचा कार्यक्रम कमी करून ३२ वरून थेट १६ जोड्यांनाच खेळविण्यात आले. हा बदल टीकेचे लक्ष्य ठरला, तरी यामुळे एकेरीतील बहुतेक प्रमुख खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग राहिला. नोव्हाक जोकोविच, कार्लोस अल्कराझ, इगा श्वीऑटेक असे नामांकित खेळाडू यात खेळले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली. मात्र, एकेरीतील तारांकितांच्या गर्दीतही एरानी-वावासोरी या दुहेरीतील विशेषज्ञ जोडीनेच बाजी मारली. यासह त्यांनी १० लाख डॉलरचे पारितोषिकही आपल्या नावे केले.
अंतिम लढतीत एरानी-वावासोरी जोडीने तिसऱ्या मानांकित इगा श्वीऑटेक आणि कॅस्पर रूट जोडीचा ६-३, ५-७ (१०-६) असा पराभव केला. विशेष म्हणजे एरानी आणि वावासोरी या दोघांनी मिश्र दुहेरीतील लढतींचे स्वरूप बदलण्याच्या निर्णयावर टीका केली होती. मात्र, जेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘इतक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत जेतेपद पटकावणे खूप खास होते.
आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानतो,’’ असे वावासोरी म्हणाला. त्याआधी, उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत एरानी-वावासोरी जोडीने अमेरिकेच्या डॅनिएले कॉलिन्स आणि ख्रिस्टियन हॅरिसन जोडीवर ४-२, ४-२ अशी मात केली होती. अन्य लढतीत श्वीऑटेक-रूड जोडीने जेसिका पेगुला आणि जॅक ड्रॅपर जोडीचा ३-५, ५-३ (१०-८) असा पराभव केला होता.