युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने क्वार्टर फायनलमध्ये मोठा धमाका करत युक्रेनला बाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडने या स्पर्धेत बलाढ्य संघाला चारी मुंड्या चीत करत चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने थाटात सेमीफायनल गाठली. इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य जर्मनीलाही धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनवर अतिरिक्त वेळेत २-१ अशी सरशी साधत युक्रेननं प्रथमच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण, युरो कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडने युक्रेनला पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने सेमीफायनल प्रवेश मिळवला आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत एकही गोल न स्विकारण्याचा आपला रेकॉर्ड अबाधित राखत इंग्लडने युक्रेनला ४-० असं पराभूत केलं.

नॉक आउट स्टेजमध्ये ४ गोल डागण्यासाठी इंग्लंडला खूप वेळ वाट बघावी लागली नाही. सामन्याच्या सुरुवातीच्या चौथ्या मिनिटाला कर्णधार हॅरीने संघाचं खातं उघडलं. पहिल्या हाफमध्येच इंग्लंडनं १-० अशी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये ४६व्या मिनिटाला इंग्लडने दुसरा गोल नोंदवला. हॅरी मागुइरे याने गोल डागत संघाला २-0 अशी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा- डेन्मार्कची घोडदौड!; चेक प्रजासत्ताकला २-१ असे हरवत उपांत्य फेरीत आगेकूच

त्यानंतर ५०व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केननं आणखी एक गोल करत आघाडीत ३-० अशी भर टाकली. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जार्डन हँडरसन याने संघाच्या खात्यात चौथ्या गोलची भर घातली. क्वार्टर फायनलसारख्या मोठ्या स्पर्धेत जार्डनचा हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला. १९६६ च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने ४-२ असा विजय नोंदवला होता.