युरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल न करता आलेल्या दोन्ही संघांनी सामन्याच्या शेवटच्या ४५ मिनिटांमध्ये एकूण पाच गोल केले. सामन्याच्या ८५ व्या मिनिटाला २-२ ची बरोबरी फोडणारा तिसरा गोल करत नेदरलँडने निसटता विजय मिळवला. हा निर्णायक गोल नेदरलँडच्या डमफ्राइजने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघानी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र कोणालाही यश आलं नाही. पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात दोन्ही संघामध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. सेकेण्ड हाफला सुरुवात झाल्यानंतर सातव्या मिनिटालाच म्हणजेच सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला नेदरलँडने सामन्यातील पहिला गोल आपल्या नावे केला. विझनालडमने हा श्रीगणेशा करणारा गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला वेगॉर्टने गोलपोस्टचा वेध घेत नेदरलँडची आघाडी १-० वरुन २-० वर नेली. दुसऱ्या गोल सहीत युक्रेनवर दबाव वाढवण्यात नेदरलँडला यश आलं. त्यानंतर सामना हातला जाऊ नये म्हणून युक्रेनने आपलं आक्रमण अधिक वेगवान केलं. नेदरलँडने २-० ची आघाडी घेतल्यानंतर १७ मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला युक्रेनने आपला पहिला गोल झळकावला. युक्रेनच्या यारमोलन्कोने हा गोल झळकावला.

सामना २-१ असा असतानाच युक्रेनने पहिल्या गोलनंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ७९ मिनटाला दुसरा गोल झळकावत २-२ ची बरोबर केली. सामन्याच्या शेवटच्या ११ मिनिटांमध्ये दोन्ही संघ विजयी गोल नोंदवण्यासाठी धडपड करताना दिसले. मात्र यामध्ये नेदरलँडचा संघ युक्रेनपेक्षा सरस ठरला. २-२ ची बरोबर अवघी सहा मिनिटं टिकली अन् नेदरलँडने ८५ व्या मिनिटाला आपला तिसरा गोल नोंदवला. डमफ्राइजने हा निर्णायक गोल केला. सामन्यातील चुरस पाहून ९० मिनिटांचा खेळ झाल्यानंतरही दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळामध्येही युक्रेनला बरोबरी करण्याची संधी नेदरलँडने दिली नाही आणि यंदाच्या युरो कपमधील पहिलाच सामना त्यांनी खिशात घातला.

अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये सामना नेदरलँडने जिंकला असला तरी बॉल पझेशनची आकडेवारी पाहिल्यास सामन्यावर नेदरलँडचेच वर्चस्व होतं असं स्पष्ट होतं. एकूण वेळेपैकी ७८ टक्के कालावधीसाठी बॉल नेदरलँडच्या खेळाडूंकडे होता तर युक्रेनच्या ताब्यात बॉल असण्याची टक्केवारी ३८ इतकी होती. दोन्ही संघांनी गोल करतानाचे ८ प्रयत्न ऑफ टार्गेट गेले. तर सात ऑन टार्गेट प्रयत्नांपैकी पाच गोल झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro cup 2020 netherlands vs ukraine netherlands beat ukraine by one goal scsg
First published on: 14-06-2021 at 07:26 IST