युरोपियन फुटबॉल महासंघाच्या (युएफा) प्रतिष्ठेच्या युरोपियन अजिंक्यपद अर्थात ‘युरो २०१६’ फुटबॉल स्पध्रेचे वेळापत्रक शनिवारी मध्यरात्री पॅरिसमध्ये जाहीर करण्यात आले. सलग तिसऱ्या वर्षी जेतेपद जिंकण्यासाठी आतुर असलेल्या स्पेनला युरो २०१६ फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विश्वविजेत्या जर्मनीला ‘क’ गटात युक्रेन, पोलंड आणि उत्तर आर्यलड यांचा सामना करावा लागणार आहे. १० जूनला फ्रान्स विरुद्ध अल्बानिया यांच्यात उद्घाटनीय सामना पॅरिस येथील सेंट-डेनिस स्टेडियमवर होणार आहे. याच ठिकाणी १० जुलैला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्यांना ‘ड’ गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर झेक प्रजासत्ताकसह टर्की व क्रोएशिया हे उभे ठाकणार आहेत. १३ जूनला टौलाऊस येथे स्पेन विरुद्ध झेक प्रजासत्ताक हा सामना रंगणार आहे. १९८४नंतर घरच्या मैदानावर पुन्हा एकदा युरो चषक उंचावण्याची संधी फ्रान्सपुढे चालून आली आहे. २००० साली फ्रान्सने बेल्जियम व नेदरलँड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली झालेली युरो चषक स्पर्धा जिंकली होती. ‘अ’ गटात रोमानियाविरुद्ध फ्रान्स आपल्या अभियानाची सुरुवात करेल. हा सामना पॅरिसमध्ये १० जूनला होणार आहे. हे दोन्ही संघ २००८च्या युरो स्पध्रेत समोरासमोर आले होते आणि तो सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. ‘अ’ गटात फ्रान्स आणि रोमानिया व्यतिरिक्त स्वित्र्झलड आणि अल्बानिया यांना स्थान देण्यात आले आहे. १९९६नंतर युरो चषक उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेला जर्मनीचा संघ १२ जून रोजी लिले येथे युक्रेनविरुद्ध मोहिमेची सुरुवात करणार आहे. इंग्लंडचा मुकाबला पक्का शेजारी वेल्सशी होणार आहे. १९५८च्या विश्वचषक स्पध्रेनंतर वेल्स पहिल्यांदा मुख्य स्पध्रेसाठी पात्र ठरला आहे. इंग्लंड व वेल्स यांच्यातील हा १०२वा मुकाबला असून १८७९नंतर हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘ब’ गटात इंग्लंडचा पहिला सामना रशियाविरुद्ध होणार असून स्लोव्हाकियाही याच गटात आहे. जागतिक फुटबॉल संघटनेच्या (फिफा) आकडेवारीनुसार जगातील सवरेत्कृष्ट संघ असलेल्या बेल्जियमला ‘ई’ गटात इटली, स्वीडन आणि आर्यलड यांचा सामना करावा लागेल. ‘फ’ गटात पोर्तुगाल, आइसलँड, ऑस्ट्रिया व हंगेरी यांचा सहभाग आहे. स्पध्रेतील गटवारी अ गट : फ्रान्स, रोमानिया, अल्बानिया, स्वित्र्झलड ब गट : इंग्लंड, रशिया, वेल्स, स्लोव्हाकिया क गट : जर्मनी, युक्रेन, पोलंड, उत्तर आर्यलड ड गट : स्पेन, झेक प्रजासत्ताक, टर्की, क्रोएशिया ई गट : बेल्जियम, इटली, आर्यलड, स्वीडन फ गट : पोर्तुगाल, आइसलँड, ऑस्ट्रिया, हंगेरी