मुंबई : युवा ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ दिव्या देशमुखने स्वप्नवत कामगिरी करताना महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. १९ वर्षीय दिव्याने हा टप्पा गाठताना जागतिक क्रमवारीत अव्वल १० पैकी तीन खेळाडूंना शह देण्याची किमयाही साधली आहे. मात्र, आता जेतेपदाची ध्येयप्राप्ती करताना तिची कसोटी लागणार आहे. अंतिम फेरीत दिव्यासमोर तिच्यापेक्षा दुप्पट वय आणि कितीतरी पटीने अधिक अनुभव असलेल्या कोनेरू हम्पीचे आव्हान असल्याने ही दोन पिढ्यांमधील लढत ठरणार आहे. या लढतीचा पहिला पारंपरिक डाव आज, शनिवारी खेळवला जाईल.
गेल्याच वर्षी कनिष्ठ गटात जगज्जेतेपद मिळविणाऱ्या दिव्याची विश्वचषक स्पर्धेतील घोडदौडही थक्क करणारी आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित चीनची झू जिनेर, उपांत्यपूर्व फेरीत भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका, मग उपांत्य फेरीत माजी जगज्जेत्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या चीनच्या टॅन झोंगयीला पराभवाचा धक्का देत दिव्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दिव्याच्या तुलनेत हम्पीचा प्रवास अधिक सुरळीत झाला असला, तरी उपांत्य फेरीत अग्रमानांकित चीनच्या ली टिंगजीने तिला चांगलेच झुंजवले. तीन दिवस, विविध प्रकारचे आठ डाव अशा ‘मॅरेथॉन’ लढतीअंती हम्पीने ५-३ अशी बाजी मारत प्रथमच विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले.
हम्पी अतिशय संयमाने खेळ करण्यासाठी ओळखली जाते. याचाच प्रत्यय विश्वचषक स्पर्धेतही आला आहे. दुसरीकडे, दिव्याने आक्रमकतेला पसंती देत खेळ केला आहे. मात्र, तिची उपांत्य फेरीतील टॅन झोंगयीविरुद्धची कामगिरी लक्षवेधी ठरली. पहिल्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळावे लागल्याने दिव्याने बचावास प्राधान्य दिले. यावेळी तिच्यातील प्रगल्भता आणि खेळाची दुसरी बाजू दिसून आली. त्यानंतर दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याला टॅनने सहजासहजी जिंकू दिले नाही. अखेर पाच तास, १०१ चालींच्या लढ्यानंतर दिव्याने इतिहास घडवला आणि महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय ठरण्याचा मान मिळवला.
भारताची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेली हम्पी २०११ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळली होती. त्यावेळी दिव्या जेमतेम पाच वर्षांची होती. काही वर्षांनी तिचा बुद्धिबळातील प्रवास सुरू झाला, तोही अपघाताने. बहीण बॅडमिंटनचे धडे घेत असताना दिव्याही तिथे जायची. मात्र, तिला बॅडमिंटनची गोडी निर्माण झाली नाही. त्याच ठिकाणी बुद्धिबळाचेही प्रशिक्षण दिले जात होते. तिथे दिव्या आकर्षित झाली. तिथपासून सुरू झालेला प्रवास दिव्याला आता विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन आला आहे. आता विश्वचषक भारतात येणार हे निश्चित असले, तरी तो दिव्या नागपुरात आणणार की हम्पी आंध्रमध्ये घेऊन जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतातील बुद्धिबळप्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण आहे. विश्वचषक भारतात येणार हे निश्चित आहे. केवळ विजेती कोण हे ठरायचे बाकी आहे. दिव्याने या स्पर्धेत अप्रतिम खेळ केला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत तिला हरवणे सोपे नसेल हे निश्चित. – कोनेरू हम्पी
विश्वचषकाची अंतिम फेरी ही दोन पिढ्यांमधील लढत आहे. हम्पी (वय ३८ वर्षे) आणि दिव्या (१९) यांची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. हम्पीचे वडील राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू होते आणि तिची बहीण चंद्रहंसा हीसुद्धा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा खेळलेली आहे. याउलट दिव्याच्या घरी बुद्धिबळाचा इतिहास नाही. आई-वडील दोघेही डॉक्टर आणि मोठी बहीण वकील. हम्पी मनाने खंबीर आणि जास्त धोका न पत्करणारी, तर दिव्या तिच्या वयानुसार बिनधास्त खेळणारी. त्यामुळे दोन भिन्न शैली आणि वयोगटातील खेळाडूंमधील अंतिम लढत उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही. – रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.
कोनेरू हम्पी
लाइव्ह रेटिंगमध्ये
एलो गुण : २५३७.४
स्थान : चौथी
विश्वचषक प्रवास
उपउपांत्यपूर्व फेरी
वि. ॲलेक्झांड्रा कोस्टेनियुक
उपांत्यपूर्व फेरी
वि. सॉन्ग युशीन (चीन)
उपांत्य फेरी
वि. ली टिंगजी (चीन)
दिव्या देशमुख
लाइव्ह रेटिंगमध्ये
एलो गुण : २४७६.२
स्थान : १६वी
विश्वचषक प्रवास
उपउपांत्यपूर्व फेरी
वि. झू जिनेर (चीन)
उपांत्यपूर्व फेरी
वि. द्रोणावल्ली हरिका (भारत)
उपांत्य फेरी वि. टॅन झोंगयी (चीन)