भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी मध्यरात्री दोन वाजता त्याचे राजधानी नवी दिल्लीत आगमन झाले.. त्यानंतर चार तासांत इंडियन एसेस संघातील सहकाऱ्यांसमवेत त्याने खेळाचे नियम समजून घेतले.. आणि पुढच्या काही तासांत मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी आणि पुरुष एकेरी अशा तीन विभिन्न प्रकारच्या सामन्यांत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत त्याने भारतीय चाहत्यांना अनोखी भेट दिली.. ज्याच्या आगमनाची गेले अनेक महिने चर्चा होती, तो ‘आधुनिक टेनिसचा राजा’ रॉजर फेडरर भारतभूमीवर अवतरला.. प्रदर्शनीय स्वरूपाच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)मध्येही फेडररने आपल्या कलात्मक खेळाची झलक सादर करत देशभरातून दिल्लीत आलेल्या चाहत्यांना जिंकले.. टेनिसचा अखंड ध्यास जपणाऱ्या रॉजर फेडररने जेट लॅग, अपुरी झोप या कशानेही विचलित न होता व्यावसायिकतेचे सर्वोत्तम उदाहरण पेश केले.
शनिवारी फेडररदर्शनाविना परतलेल्या हजारो टेनिसप्रेमींनी रविवारी सामन्याच्या दोन तास आधीपासूनच इंदिरा गांधी स्टेडियम गाठले. फेडररचे नाव असलेल्या टोप्या, टी-शर्ट, त्याच्या ग्रँड स्लॅम विजयाची छायाचित्रे अशा साहित्यानिशी जमलेल्या चाहत्यांना केवळ त्याला पाहायचे होते. फेडररचा संघ असलेल्या इंडियन एसेस आणि सिंगापूर स्लॅमर्स यांच्यातल्या लढतीपूर्वी एकेक खेळाडूची ओळख करून दिली जात होती. निवेदकाने रॉजरचे नाव घेताच ‘रॉजर.. रॉजर’च्या घोषणांनी स्टेडियमचा परिसर निनादला. काळा टी-शर्ट, ग्रे रंगाची शॉर्ट्स, हेडबँड, शुभ्रधवल रंगाचे शूज अशा पेहरावात दाखल झालेल्या फेडररला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली. त्याच्या प्रत्येक सव्‍‌र्हिसला, परतीच्या फटक्याला ‘रॉजर’ नामाचा जल्लोष होत होता. खेळ देशांच्या सीमा ओलांडून मने जिंकतो, ही उक्ती फेडरर आणि त्याच्या कट्टर चाहत्यांनी प्रत्यक्षात खरी करून दाखवली.
‘‘भारतीय चाहत्यांच्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे. वातावरणातली ऊर्जा प्रेरणादायी होती. ही लीग वेगळ्या स्वरूपाचा प्रयत्न आहे. नियमांशी जुळवून घेताना मला थोडा वेळ गेला. संघासाठी खेळणे माझ्यासाठी अनोखा अनुभव होता,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत फेडररने भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Federer in iptl
First published on: 08-12-2014 at 02:52 IST