वय वर्षे ७१.. मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदाखाली अखेरचा १४९९वा सामना.. लाल रंगाने न्हाऊन निघालेले स्टेडियम.. ‘चॅम्पियन्स, चॅम्पियन्स’ची घोषणाबाजी.. सोबतीला मुसळधार पावसाची हजेरी.. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उभी राहून दिलेली मानवंदना.. अशा प्रेमळ वातावरणात ब्रिटिश फुटबॉलमधील सर्वोत्तम प्रशिक्षक ठरलेल्या सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांना निरोप देण्यात आला. १३वे इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद उंचावणारे फग्र्युसन ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील वातावरणाने भारावून गेले.
शिस्तप्रिय फग्र्युसन यांनी २७ वर्षांच्या युनायटेडच्या कारकीर्दीचा समारोप करताना अश्रूंना आपलेसे केले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अखेपर्यंत कायम होते. भावनाविवश झालेल्या फग्र्युसन यांच्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी चाहत्यांसह अनेकांचे आभार मानले. जुन्याच करडय़ा संघाच्या कोटमध्ये स्टेडियममध्ये अवतरलेल्या फग्र्युसन यांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमला फेरी मारत चाहत्यांच्या प्रेमाचा, अभिनंदनाचा स्वीकार केला. आतापर्यंत अनेक दिग्गज फुटबॉलपटूंना घडवणाऱ्या फग्र्युसन यांच्या अखेरच्या सामन्यासाठी स्टीव्ह ब्रूस, ब्रायन रॉबसन आणि बॉबी चार्लटनसारख्या महान फुटबॉलपटूंनी हजेरी लावली होती.
स्वानसी सिटीविरुद्धची लढत हा फग्र्युसन यांच्यासाठी कारकिर्दीतील अखेरचा सामना नव्हता, तर त्यांनी कारकिर्दीत गाठलेल्या कामगिरीला दिलेली मानवंदना होती. ‘‘माझ्या निवृत्तीने युनायटेडबरोबरचे माझे आयुष्य संपलेले नाही. यापुढेही युनायटेडच्या प्रत्येक सामन्याचा निखळ आनंद मी लुटणार आहे. माझ्या प्रवासात चाहत्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले. पडत्या काळातही त्यांनी माझी साथ सोडली नाही. त्यामुळे मी प्रत्येक चाहत्याचा मनापासून आभारी आहे,’’ असे फग्र्युसन यांनी सांगितले.
मँचेस्टर युनायटेडने स्वानसी सिटीविरुद्धचा हा सामना २-१ असा जिंकला तरी वेन रूनी युनायटेडला सोडचिठ्ठी देणार, या बातमीने संपूर्ण स्टेडियममध्ये चर्चेला उधाण आले होते. या सामन्यासाठी फग्र्युसन यांनी युवा फुटबॉलपटूंसह पॉल स्कोल्स, रायन गिग्जसारख्या जुन्या खेळाडूंनाही संधी दिली. जेवियर हेर्नाडेझने ३९व्या मिनिटाला गोल करून मँचेस्टर युनायटेडला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला आणखीनच उधाण आले. दुसऱ्या सत्रात ४९व्या मिनिटाला मिग्युएल मिकू याने गोल करून स्वानसी सिटीला बरोबरी साधून दिली. आतापर्यंत शांत बसलेल्या फग्र्युसन यांनी खऱ्या अर्थाने सामन्याची सूत्रे हातात घेतली आणि फुटबॉलपटूंना हलवण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत एकही गोल लगावता न आलेल्या रिओ फर्डिनांड याने ८७व्या मिनिटाला गोल करून २-१ अशा विजयासह फग्र्युसन यांचा शेवट गोड केला.

‘ग्रॅन्डडॅड २०’
मँचेस्टर युनायटेड संघावर आणि खेळाडूंवर कुटुंबाप्रमाणे प्रेम करणाऱ्या ‘कुटुंबप्रमुखाला’ निरोप देण्यासाठी अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांच्या पत्नीसह ११ नातवंडांनी ओल्ड ट्रॅफर्डवर हजेरी लावली होती. इंग्लिश प्रीमिअर लीगची २० जेतेपदे पटकावणाऱ्या युनायटेडचे सर्वोत्तम प्रशिक्षक ठरलेल्या फग्र्युसन यांच्यासाठी ‘ग्रॅन्डडॅड २०’ असे लिहिलेली युनायटेडची जर्सी घालून त्यांनी आपल्या लाडक्या आजोबांना मानवंदना दिली. ‘‘पत्नी कॅथीने ४७ वर्षे माझ्या कुटुंबाची धुरा सांभाळली. तिने माझ्यासाठी बराच त्याग केला. बहीण आणि जिवलग मैत्रीण ब्रिजेटचे निधन झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिला आधार देण्यासाठीच मी निवृत्तीचा निर्णय घेतला,’’ असेही फग्र्युसन यांनी स्पष्ट केले.