गतविजेत्या सेबॅस्टियन वेटेलपेक्षा फेरारीचा फर्नाडो अलोन्सो या वर्षीच्या फॉम्र्युला-वन विश्वविजेतेपदासाठी योग्य आहे, असे मत मॅकलॅरेनचा ड्रायव्हर जेन्सन बटन याने व्यक्त केले.
या मोसमातील विश्वविजेतेपद कोण पटकावणार असे विचारले असता २००९चा विश्वविजेता बटन म्हणाला, ‘‘माझ्या मते, अलोन्सो हाच विश्वविजेतेपदासाठी योग्य आहे. या मोसमात अलोन्सोने एकदाही चूक न करता कामगिरीत सातत्य राखले आहे. अलोन्सोला मिळालेल्या कारसह त्याने सुरेख कामगिरी केली आहे. त्याउलट सेबॅस्टियन वेटेलच्या कामगिरीत सातत्य दिसलेच नाही. गेल्या काही शर्यती जिंकून त्याने ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे ते चांगली कार मिळाल्यामुळेच. संपूर्ण मोसमात कामगिरीत सातत्य राखणे महत्त्वाचे असते. अलोन्सोने प्रत्येक शर्यतीत आपल्या कर्तृत्वाचा, गुणवत्तेचा ठसा उमटविला. प्रत्येक शर्यतीत त्याने गुणांची कमाई केली आहे.’’
अप्रतिम कार मिळाल्यामुळे वेटेलला फॉम्र्युला-वनच्या गेल्या तीन मोसमांवर वर्चस्व गाजवता आले, या चर्चेचा वेटेलने इन्कार केला. पण बटनने त्याउलट मत व्यक्त केले. ‘‘वेटेलने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. पण रेड बुलने त्याच्या कारवर बरीच मेहनत घेतली असल्यामुळे तो सरस ठरत आहे. या मोसमाच्या सुरुवातीला अलोन्सो आणि फेरारी यांना चांगली सुरुवात करता आली नव्हती. पण नंतर त्यांचे भाग्य उजळले. अलोन्सोला विश्वविजेतेपदाची संधी नाही, असे मी मोसमाच्या सुरुवातीला म्हणालो होतो. पण त्याने जोमाने पुनरागमन केले,’’ असे बटनने सांगितले.