देशात क्रीडा संस्कृतीची शिस्तबद्ध जपणूक करणाऱ्या देशांच्या मांदियाळीत ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. या संस्कृतीचा ठसा विविध खेळांमधील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाने सिद्ध होते. फुटबॉलच्या बाबतीत मात्र वर्चस्वापेक्षा स्वान्तसुखाय हा शब्दच ऑस्ट्रेलियाच्या प्रवासाला लागू ठरावा. १९२२मध्ये फुटबॉलचे बीज या देशात रोवले गेले. १९२२ ते २०१४ या तब्बल ९२ वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाला केवळ तीनदा विश्वचषक वारी करता आली. गुणवत्ता असूनही सातत्याचा अभाव आणि भौगोलिक अंतराच्या मुद्यामुळे फुटबॉलमध्ये कांगारूंना घोडदौड करता आलेली नाही. युरोपातील इंग्लिश प्रीमिअर लीग किंवा ला लिगा, सीरी ए अशा स्पर्धापासून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दूरच असतात. फुटबॉलमध्ये दोन देशांमध्ये होणाऱ्या लढतींपेक्षा विविध क्लब्सदरम्यान होणाऱ्या सामन्यांची संख्या प्रचंड असतात. क्लब संस्कृतीत मर्यादित प्रतिनिधित्व आणि पर्यायाने अपुरा सराव यामुळे व्यावसायिक दर्जाच्या फुटबॉलपासून ते दूरच राहिले. विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी असलेली प्रचंड चुरस ऑस्ट्रेलियाला अद्याप झेपलेली नाही. १९७४साली हौशागवशा खेळाडूंच्या जोरावर उभारलेल्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाचे तिकीट मिळवले, मात्र डावपेच, तंत्रकौशल्ये यामध्ये व्यावसायिक दर्जाचा अभाव असल्यामुळे त्यांना पहिल्या फेरीतच माघारी परतावे लागले. चिलीविरुद्धची लढत त्यांनी गोलशून्य बरोबरीत सोडवली, परंतु स्पर्धेत एकही गोल न करताच त्यांना परतावे लागले. या दुर्मीळ संधीनंतर त्यांचे संघर्ष पर्व सुरू झाले. ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र १९६६ (उत्तर कोरिया), १९७० (इस्रायल), १९८६ (स्कॉटलंड), १९९८ (इराण), १९९४ (अर्जेटिना), २००२ (उरुग्वे) अशा सहा वेळा पात्रता लढतींमध्ये झालेल्या पराभवामुळे विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.
अखेर ३२ वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियाने २००६साली जर्मनीत झालेल्या विश्वचषकात स्थान पटकावले. फुटबॉलच्या सर्वोच्च व्यासपीठावर खेळण्याची त्यांची ईर्षां या स्पर्धेत प्रकर्षांने दिसून आली. प्राथमिक फेरीचा अडथळा पार करत त्यांनी अंतिम सोळा संघात आगेकूच केली, मात्र या फेरीत जबरदस्त फॉर्मात असलेल्या इटलीने त्यांना गाशा गुंडाळायला लावला. विश्वचषक पर्वातली ऑस्ट्रेलियाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या पराभवाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करत त्यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचे तिकीट मिळवले. बलाढय़ जर्मनीने त्यांचा ४-० असा धुव्वा उडवला. घानाविरुद्ध त्यांना १-१ बरोबरीत समाधान मानावे लागले तर सर्बियाविरुद्ध २-१ असा विजय मिळवला, मात्र गोलफरकानुसार घानाने बाद फेरीत धडक मारली आणि त्यांना परतावे लागले. या विश्वचषकापर्यंत पोहचण्यासाठीही त्यांना बरीच खटपट करावी लागली आहे. पात्रता फेरीत थायलंडविरुद्ध त्यांनी विजय मिळवला, मात्र ओमानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पुढच्या फेरीत ओमान आणि जपानविरुद्ध त्यांनी बरोबरी केली तर जॉर्डनने त्यांना २-१ असे नमवले. या साधारण दर्जाच्या कामगिरीमुळे विश्वचषकवारीचे स्वप्न धोक्यात आले होते. मात्र बरोबरीत सोडवलेले दोन सामने आणि इराकवर मिळवलेल्या विजयाच्या जोरावर त्यांनी शेवटच्या क्षणी रिओच्या दिशेने जाणारे विमान पकडले. विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर ब्राझील आणि फ्रान्सविरुद्धच्या मत्रीपूर्ण लढतीत ०-६ असा मानहानीकारक पराभवामुळे प्रशिक्षक होल्गर ओसेइक यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी राष्ट्रीय युवा संघाच्या अँगे पॉसटेकॉगलोयू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी टीम काहिल ऑस्ट्रेलियासाठी हुकमी एक्का असणार आहे. मधल्या फळीतला आणि गोल करण्यात तरबेज ल्युकास नेइलकडून सॉकरूसला मोठय़ा अपेक्षा आहेत. गोल करण्याइतकेच गोलसाठी अनुकूल परिस्थिती करून देण्यात निष्णात ब्रेट हॉलमन ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मात्र संघात तिशीतील खेळाडूंचे प्रमाण जास्त असल्याने वेगवान हालचालींवर मर्यादा येऊ शकतात.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
शारीरिक तंदुरुस्ती आणि जबरदस्त ऊर्जा हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाचे वैशिष्टय़ फुटबॉलमध्येही विशेषत्वाने जाणवते. मात्र या ऊर्जेला अचूकतेची जोड नसल्याने परिणाम सकारात्मक दिसत नाहीत. गोल झळकावण्यात हा संघ कुशल आहे, मात्र बचावामध्ये ‘सॉकरूस’ पिछाडीवर पडतात. बाद फेरीत आगेकूच करण्यासाठी त्यांना बचाव मजबूत करावा लागेल. खेळातले ध्रुवीकरण कमी करून सर्वसमावेशक खेळ करण्याचे उद्दिष्ट त्यांना अंगीकारावे लागेल. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव हे धोरण स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषकातील झटपट परतीचा पूर्वेतिहास बदलण्याचे आव्हान आहे.
अपेक्षित कामगिरी
स्पेन, नेदरलँड्स आणि चिली अशा तगडय़ा प्रतिस्पध्र्याचा ऑस्ट्रेलियाला सामना करावा लागणार आहे. स्पेनचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. नेदरलँण्ड्सचा संघही जेतेपदासाठी शर्यतीत आहे मात्र सध्या त्यांची कामगिरी लौकिलाला साजेशी नाही. नेदरलँण्ड्सच्या या ढासळत्या कामगिरीचा फायदा उठवत चिलीला आपला तडका दाखवण्याची संधी आहे. आशिया खंडातून विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या मोजक्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. मात्र प्राथमिक फेरीतच उभे ठाकलेले आव्हान पाहता ऑस्ट्रेलियाची ब्राझीलवारी अल्पावधीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मात्र पूर्वेतिहास बाजूला सारत ठसा उमटवण्याचा ऑस्ट्रेलियाचा इरादा अन्य संघांना धोक्याचा इशारा ठरू शकतो.