कुमार विश्वचषक स्पर्धेचे बिगूल वाजले; भारत पहिल्यांदाच ‘फिफा’च्या जागतिक स्पर्धेत खेळणार

भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांती घडवणारी घटना शुक्रवारी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर घडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासह देशातील मंत्रीगण, जागतिक महासंघाचे पदाधिकारी व  माजी फुटबॉलपटू येथे जमणार आहेत. शुक्रवारची ही पहाट भारतीय क्रीडाक्षेत्राला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) पहिलीवहिली स्पर्धा भारतात होत आहे. ६ ऑक्टोबरला सायंकाळी बरोबर ५ वाजता नवी दिल्ली येथे या ऐतिहासिक क्षणाचे बिगूल वाजेल. कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धा ही भारताला त्यांच्या जुन्या खेळाची नव्याने ओळख करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय संघात स्थान पटकावणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा अभिमानास्पद दिवस असणार आहे. शिंप्याचा, रिक्षाचालकाचा, फळ विक्रेत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या या खेळाडूंनी आपल्या अथक मेहनतीच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर इथवर मजल मारली आहे. भारताची निळी जर्सी परिधान करून या स्पर्धेत खेळण्याचा बहुमान त्यांनी मिळवला तो जिद्दीच्या जोरावर. पहिल्यांदाच जागतिक दर्जाच्या स्पर्धेत हजारो लोकांसमोर खेळताना त्यांच्यावर दडपण असेलही, परंतु या संधीचे सोने करण्यासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा निर्धार या खेळाडूंनी बोलून दाखवला आहे.

भारताला पहिल्या लढतीत बलाढय़ अमेरिकेविरुद्ध खेळावे लागणार आहे. कुमार विश्वचषक स्पर्धेत १५ वेळा खेळण्याचा अनुभव अमेरिकेकडे असला तरी पदार्पणातच भारतीय संघ घरच्या पाठीराख्यांसमक्ष आश्चर्यकारक निकाल नोंदवण्यासाठी तयार आहे. अनुभवापेक्षा खेळाडूंची मजबूत इच्छाशक्ती ही भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. भारताचे प्रशिक्षक लुइस नॉर्टन डी मॅटोस यांनीही खेळाडूंच्या याच निर्धारावर विश्वास टाकला आहे. या लढतीत जय-पराजयापेक्षा भारतीय खेळाडूंच्या चिकाटीकडे आणि लढाऊ वृत्तीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या संघानेही यजमानांना कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेच्या निकालापेक्षा फुटबॉलच्या नव्या पर्वाची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

संघ

भारत

  • गोलरक्षक : धीरज सिंग, प्रभुसुखन गिल, सन्नी धलीवाल
  • बचावपटू : बोरीस सिंग, जितेंद्र सिंग, अनवर अली, संजीव स्टॅलिन, हेन्ड्री अँटोनाय, नमित देशपांडे
  • मध्यरक्षक : सुरेश सिंग, निंथोइंगांबा मिटेई, अमरजीत सिंग कियाम (कर्णधार), अभिजित सरकार, कोमल थाटल, लालेंगमावीया, जिक्सन सिंग, नोंगदाम्बा नाओरेम, राहुल कॅन्नोली प्रविण, मोहम्मद शाहजहान
  • आघाडीपटू : रहिम अली, अनिकेत जाधव

अमेरिका

  • गोलरक्षक : अ‍ॅलेक्स बुडिंक, डॉस सँटोस, जस्टी गास्रेस
  • बचावपटू : जेम्स सँड्स, जेलीन लिंडसी, ख्रिस ग्लोस्टर, टेलर शेव्हर, ख्रिस डर्कीन, सेर्गिनो डेस्ट, अकिल वॉट्स
  • मध्यरक्षक : ब्लैने फेरी, अ‍ॅण्ड्रू कार्लेटन, टेलर बूथ, जॉर्ज अ‍ॅकोस्टा, ख्रिस गोस्लीन, इंडियाना व्हॅसिलेव्ह
  • आघाडीपटू : आयो अ‍ॅकीनोला, जोश सरजट, टिम वीह, ब्रायन रेयनोल्ड्स, जेकोब रेयेस