फुटबॉल म्हणजे मर्दानी खेळ. त्या मैदानावर नाजूक कमनीयतेला वाव नाही. ती कसर भरून निघते ती मैदानाबाहेरच्या ‘वॉग्स’मुळे. ‘वॉग्स’ म्हणजे नावाजलेल्या फुटबॉलपटूंच्या पत्नी किंवा मैत्रीणी. त्यांचे अस्तित्व, त्यांचे नखरे, त्यांच्या अदा हे सगळे नेहमीच खमंग चर्चेचा विषय. नखऱ्यांची, सौंदर्याची, लोकप्रियतेची मक्तेदारीच जणू त्यांच्याकडे असे. पण ही कालपरवापर्यंतची गोष्ट. तसे आताही विश्वचषक फुटबॉल स्पर्धाचा थरार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना दिग्गज फुटबॉलपटूंच्या पत्नी आणि मैत्रिणींचे पर्यटन, छायाचित्रण असे लोकप्रियता वाढवणारे बरेच उपक्रम चालू आहेत. प्रसारमाध्यमेसुद्धा त्यांची अगदी आठवणीने दखल घेत आहेत. पण यंदा ‘वॉग्स’च्या या लोकप्रियतेला आव्हान उभे केले आहे ते फुटबॉल स्पध्रेचे वार्ताकन करायला आलेल्या सौंदर्यवती क्रीडा पत्रकार आणि क्रीडा सूत्रसंचालक  यांनी. सारा काबरेनीरो, व्हॅनीसा हुपेनकोथेन, आंद्रिया कैसर अशा काही क्रीडा पत्रकार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. जेल बेराहिमी ही त्यातलीच एक ‘हीट आणि हॉट’ क्रीडा पत्रकार. ती कोस्टा रिकासाठी यशदायी मानली जाते. या क्रीडा पत्रकारांच्या कहाण्या केवळ वार्ताकनापुरत्याच मर्यादित नसतात. त्यातील एक पत्रकार तर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या प्रेमाखातर देहप्रदर्शन करून स्वत:च वार्ताविषय बनली होती..
एकर कॅसिल्लाची पत्नी सारा काबरेनीरो पेशाने क्रीडा सूत्रसंचालक. ती सौंदर्यवती ‘वॉग्स’च्या पंक्तीत जशी आघाडीवर असते, तशीच क्रीडा वार्ताकन करणाऱ्या सौंदर्यवतींच्या यादीतसुद्धा. यंदा आपल्या चार महिन्यांच्या मुलाला घरी ठेवून ती कॅसिल्लासमवेत ब्राझीलमध्ये आली. आता स्पेनचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे आयकर मायदेशी परतला आहे, परंतु सारा अद्याप ब्राझीलमध्येच वार्ताकनात व्यग्र आहे. दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पध्रेत सारा सर्वप्रथम प्रकाशात आली. स्वित्र्झलडसारख्या संघाकडून स्पेनने पत्करलेल्या मानहानीकारक पराभवाला जसे कॅसिल्लाला जबाबदार धरण्यात आले, तसेच सारालाही. सारामुळेच तो गोल अडवू शकला नाही, अशा संदेशांचा पाऊस तेव्हा सोशल मीडियावर पडला होता. पण ही निर्थक बडबड आहे, असे सांगत साराने ते आरोप धुडकावून लावले. त्यानंतर स्पॅनिश संघाने जगज्जेतेपद जिंकण्याची किमया साधली, त्या वेळी मात्र सारालासुद्धा लोकांनी डोक्यावर घेतले. बऱ्याच स्पर्धाच्या बाबतीत प्रशिक्षक-व्यवस्थापक मंडळी पत्नी आणि मैत्रिणींबाबत नियमावली करतात. परंतु सारा वार्ताकन करीत असल्यामुळे तिला ‘व्ॉग्ज’बाबतच्या कोणत्याही बंधनांमध्ये अडकवता येत नाही.
मेक्सिकोमधील ‘टेलीव्हिजा’ वाहिनीच्या २९ वर्षीय व्हॅनीसा हुपेनकोथेन हिने सोशल मीडियावर आपल्या कामापेक्षा सौंदर्याचीच छाप अधिक पाडली आहे. ज्या दिवशी विश्वचषकातील तीन महत्त्वाचे सामने झाले, त्या दिवशी व्हॅनीसाने तिची काही छायाचित्रे प्रसारित केली. जगभरातून त्यांना ‘लाइक’ मिळाले. सिंगापूरच्या मंडळींना मेक्सिकोची इनेस सॅन्झ गॅलो अतिशय आवडते. एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे सौंदर्य लाभलेल्या इनेसने ख्रिस्तियानो रोनाल्डोची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली.
कोस्टा रिकासारखा संघ विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल, असे कुणालाही वाटले नव्हते. या संघाच्या आश्चर्यकारक भरारीचे रहस्य म्हणजे त्यांची ‘लकीचार्म’ जॅली बेराहिमी. २८ वर्षीय जॅली ‘रिप्रीटेल’ वृत्तवाहिनीसाठी क्रीडा पत्रकारिता करते. तिनेही आपल्या मादक छायाचित्रांनी सोशल मीडियावर अशीच खळबळ माजवली आहे. ती सांगते, ‘‘माझे फुटबॉल खेळावर जीवापाड प्रेम आहे. मी या खेळाचा यथेच्छ आनंद लुटते.’’ पण ती ओळखली जाते मैदानाबाहेरील सनसनाटी वृतांकनासाठी.
‘डीएसफ’ क्रीडा वाहिनीची आंद्रिया कैसर ही तर दिसते सुपरमॉडेल सौंदर्यवतीच. तिचे सहजसुंदर स्मित आणि सादरीकरण जर्मनीतील क्रीडारसिकांना भावते. आंद्रियाचे खासगी जीवनसुद्धा तितकेच चच्रेत असते. वर्षभराच्या प्रेमप्रकरणानंतर २०१०मध्ये ती व्यावसायिक फुटबॉलपटू लार्स रिकेनशी विवाहबद्ध झाली. परंतु गेल्या वर्षी घटस्फोट घेऊन तिने फ्रेंच शर्यतपटू सॅबास्टियन आगियरशी नाते जोडले. ३७ वर्षीय फेडरिका फोंटाना ‘स्काय स्पोर्ट्स’ची प्रतिनिधी म्हणून ब्राझीलमध्ये वृत्तांकन करीत आहे. लोकप्रिय क्रीडा सूत्रसंचालक म्हणून इटलीमध्ये तिची ओळख आहे. वयाच्या १८व्या वर्षांपासून सौदर्य स्पर्धामध्ये हिरिरीने सहभागी होणाऱ्या फेडरिकाने अनेक किताब जिंकले आहेत. याशिवाय अनेक मासिके आणि वृत्तपत्रांच्या जाहिरातींमध्ये तसेच कॅलेंडर्सवरही तिच्या छायाचित्रांना विशेष मागणी असते. ब्राझीलच्या रॉबर्टा सेटीमीनेसुद्धा चाहत्यांच्या संख्येत वाढ केली आहे. लंडन विद्यापीठातून डिजिटन मीडियामध्ये एमए केलेली रॉबर्टा ‘फॉक्स स्पोर्ट्स’साठी वार्ताकन करते. अमेरिकेची काय मरेसुद्धा विश्वचषकाचे सादरीकरण करण्यात मशगूल आहे.
ब्राझीलने क्रोएशियाविरुद्ध ३-१ असा विजय मिळवून विश्वचषक स्पध्रेतील आपल्या अभियानाला प्रारंभ केला. या सामन्यानंतर साओ पावलोच्या रस्त्यावर चाहत्यांच्या जल्लोषाचे वार्ताकन करणाऱ्या ‘एसपीटीव्ही’ची वार्ताहर सबिना सिमोनाटोचे एका क्रोएशियाच्या चाहत्याने सादरीकरण चालू असतानाच चुंबन घेतले. हे तर काहीच नाही. एक पत्रकार महिला तर ख्रिस्तियानो रोनाल्डोवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पोर्तुगालच्या ध्वजाच्या रंगांतील पारदर्शक पोशाख लेवून रस्त्यावर अवतरली. रोनाल्डोच्या या चाहतीच्या दर्शनासाठी मग मोठी गर्दी जमली नसती, तरच नवल.
बाद फेरी सुरू झाल्यामुळे विश्वचषकाचा कैफ आता चांगलाच भिनू लागला आहे. अनेक दिग्गज संघ माघारी परतले आहेत, तर काही संघ अनपेक्षित भरारी घेत आहेत. जगातील सर्वात सुंदर खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलचे टीव्हीवर सादरीकरण किंवा वार्ताकन करणाऱ्या या ‘ग्लॅमरस’ क्रीडा पत्रकार आणि सूत्रसंचालक महिलांची लोकप्रियतासुद्धा आणखी वाढते आहे.